राज्यातील ढगाळ स्थिती निवळून हवामान कोरडे झाले असल्याने रात्रीच्या किमान तापमानात हळूहळू घट होत जाणार आहे. मकर संक्रांतीपर्यंत काही प्रमाणात पुन्हा थंडी अवतरण्याबाबत पोषक स्थिती सध्या आहे. कोरडय़ा हवामानाची स्थिती आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्याच्या बहुतांश भागांत गेल्या आठवडय़ात ढगाळ वातावरण होते. मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागांत काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरीही लावली. या वातावरणानंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय वाढ होऊन थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. सध्या पावसाळी स्थिती निवळली असली, तरी तापमानातील वाढ कायम आहे. मध्य महाराष्ट्रात अद्यापही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ ते ८ अंशांनी अधिक आहे. कोकण विभागातील मुंबईसह सर्वच भागांत ४ ते ६ अंशांनी वाढ आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तापमानातील वाढ कायम आहे. त्यामुळे रात्री गारव्याऐवजी उकाडा जाणवत आहे.

उत्तरेकडील काही राज्यांमध्ये एक-दोन दिवसांत थंडीची लाट येणार आहे. मात्र, याच काळात दक्षिणेकडील भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन काही प्रमाणात पाऊस होणार आहे. या काळात महाराष्ट्रातील तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील पावसाची स्थिती निवळल्यानंतर तापमान सरासरीच्या आसपास किंवा काही प्रमाणात खाली येऊन राज्यात थंडी अवतरण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक तापमान रत्नागिरीत

ढगाळ स्थिती निवळल्यानंतर सूर्याची किरणे विनाअडथळा भूभागावर पोहोचत असल्याने सध्या दिवसाच्या कमाल तापमानातही वाढ होत आहे. सर्वच ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या पुढे गेला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रत्नागिरीमध्ये राज्यातील उच्चांकी कमाल तापमानाची नोंद होत आहे. रविवारी (१० जानेवारी) रत्नागिरीत ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान देशात सर्वाधिक ठरले. त्यानंतर सोमवारीही रत्नागिरीत ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.