पुणे : करोना विषाणू संसर्गावर उपचार घेताना अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेले रेमडेसिविर इंजेक्शन मिळवता मिळवता नातेवाइकांची होणारी दमछाक गुरुवारीही कायम राहिली. त्यामुळे शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांमधील औषध दुकानांबाहेर रेमडेसिविर मिळवण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या.

देशातील सर्वाधिक सक्रिय करोना रुग्णसंख्येच्या १० जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. रुग्णसंख्या वाढीच्या वेगाबरोबरच अतिदक्षता विभागांमध्ये दाखल होणारी रुग्णसंख्याही मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचारांसाठी डॉक्टर रेमडेसिविर इंजेक्शन लिहून देत आहेत. मात्र, ते मिळवायचे कोठून आणि कसे असा प्रश्न रुग्णांच्या कु टुंबातील सदस्यांपुढे आहे. स्नोहल (नाव बदलले आहे) म्हणाल्या,की माझे नातेवाईक खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. पहिल्या दिवशी दोन डोस उपलब्ध झाले, मात्र दुसऱ्या दिवशी तिसरा डोस मिळवता मिळवता प्रचंड दमछाक झाली. इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे सहा डोस एकत्र खरेदी करता येत नाहीत, त्यामुळे रोज एक  एक डोस मिळवताना त्रास होत आहे. अनिके त (नाव बदलले आहे) वडील अति दक्षता विभागात करोनावर उपचार घेत आहेत. पहिल्या दोन डोससाठी प्रचंड धावपळ करूनही पहिल्या दिवशी दोन डोस मिळाले नाहीत. दुसऱ्या दिवशी दोन डोस मिळाले, मात्र देण्यास विलंब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उर्वरित चार डोस मिळवण्यासाठी धावपळ करत आहोत, मात्र एका दिवशी एकच डोस मिळणार या अटीमुळे

रोज इंजेक्शन शोधण्यातच वेळ खर्च होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांचा दररोज बराचसा वेळ इंजेक्शन शोध मोहिमेवरच जात आहे, अशी खंतही अनिके तने बोलून दाखवली.

महापालिकेकडून निविदा

पुणे महापालिकेने रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर गरजू रुग्णांचे नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्याची शक्यता आहे.