राष्ट्रवादीच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

अजित पवार नावाचे ‘बारामतीचे पार्सल’ पिंपरी-चिंचवडकरांनी परत पाठवले आहे. ‘हम करे सो कायदा’ या पवारांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला जनता वैतागली होती, म्हणूनच राष्ट्रवादीला बाहेर घालवून जनतेने विश्वासाने भाजपच्या हातात कारभार दिला आहे, त्या विश्वासाला कधीही तडा दिला जाणार नाही, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. राष्ट्रवादीचे पिंपरीतील अनेक नगरसेवक भाजपमध्ये येण्यास उत्सुक असून ते माझ्या संपर्कात असल्याचा दावा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांवर केलेल्या टीकेसंदर्भात भाजपने पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. शहराध्यक्ष जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, माजी महापौर आझम पानसरे, पक्षनेते एकनाथ पवार आदी या वेळी उपस्थित होते. पिंपरी पालिकेतील सत्ता गेल्याने राष्ट्रवादीला महापालिकेतून मिळणारा मलिदा बंद झाला आहे. राष्ट्रवादीचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला, म्हणूनच सत्ता गेल्याची खंत ते वारंवार बोलून दाखवत आहेत. पिंपरी पालिकेचे काम पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. गेल्या १५ वर्षांत जे राष्ट्रवादीला जमले नाही, ते भाजपने एका वर्षांतच करून दाखवले आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला वैतागून जनतेने त्यांना सत्तेबाहेर घालवले आणि विश्वास असल्यामुळेच भाजपच्या हातात कारभार दिला. भाजपने विकासकामांचा सपाटा लावल्यामुळेच राष्ट्रवादी नेत्यांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच तोल सुटल्याप्रमाणे ते बेताल वक्तव्ये करून जनतेचे मनोरंजन करू लागले आहेत. हल्लाबोल आंदोलन म्हणजे ‘इव्हेन्ट मॅनेजमेन्ट’ आहे.