उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  पुण्यात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावरुन जोरदार टीका करण्यात येत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त करत आयोजकांवर कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांना सुरक्षित वावराची सातत्याने तंबी देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शनिवारी झाले. करोना नियमांच्या पायमल्लीवर टीका झाल्यामुळे अजित पवार यांना कार्यक्रमातच दिलगिरी व्यक्त करावी लागली. तसेच कार्यक्रम ज्यांनी आखला होता त्यांच्यावर कारवाई करायला सांगतो, असेही त्यांना जाहीर करावे लागले होते.

साधेपणाने, नियमाचे तंतोतंत पालन करून हा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. नियम पाळा असे आम्ही जनतेला सांगतो; पण अशा गर्दीच्या कार्यक्रमांना मला बोलवून अडचणीत टाकले जाते. धरता येत नाही आणि सोडता येत नाही, अशी माझी अवस्था होते, या शब्दांत अजित पवार यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखविली होती.

त्यानंतर आयोजक आणि शहर अध्यक्षावरकरोना विषाणू (कोविड-१९) संसर्ग साखळी तोडण्यासाठी “लेवल ऑफ रिट्रॅक्शन फॉर ब्रेकिंग द चेन” या आदेशाचा भंग केला आहे. त्यानुसार भादवि कलम १८८,२६९,२७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ब, महाराष्ट्र कोविड-१९ उपाय योजना २०२० कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पुढील गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहर अध्यक्ष महेश हांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन देशपांडे यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.