शहरातील जवळजवळ निम्म्या एटीएम केंद्रांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची बाब पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. याबाबत ‘लोकसत्ता- पुणे वृत्तान्त’ तर्फे करण्यात आलेला सर्वेक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील एटीएम केंद्रांचे सर्वेक्षण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर याबाबत पोलिसांनी बँकांना केलेल्या सूचना पाळल्या जात आहे का याचा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती पुणे पोलिसांच्या सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
शहरातील एटीएम केद्रांच्या सुरक्षिततेची काय स्थिती आहे, याबाबत ‘पुणे वृत्तान्त’तर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात शहराच्या विविध भागातील शंभर एटीएम केंद्रांची पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये जवळजवळ निम्म्या एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. उरलेल्या ठिकाणी सुरक्षारक्षक असले, तरी एकाही रक्षकाकडे शस्त्र नसल्याचे पाहायला मिळाले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या केंद्रांच्या काचा पूर्णपणे पारदर्शक असाव्या लागतात. मात्र, निम्म्या केंद्रांवर अशी स्थिती नव्हती. त्यामुळे एटीएम केंद्र व तिथे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम असल्याचे पाहायला मिळाले. याबाबत गुरुवारी ‘पुणे वृत्तान्त’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. वस्तुत: पोलिसांनी गेल्या महिन्यात बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन एटीएम केंद्रांबाबत सुरक्षितता बाळगण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. मात्र, त्यांचे पालन होत नसल्याचेच या पाहणीत आढळले.
या पाश्र्वभूमीवर सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले, की बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर थोडी प्रगती झाली आहे. मात्र, त्या सूचनांबाबत बँकांनी काय केले याचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. सूचनांचे पालन करण्यासाठी बँकांकडे पाठपुरावा केला जाईल. त्याच बरोबर शहरात किती एटीएम आहेत. किती एटीएमजवळ सुरक्षारक्षक आहे, याचा पोलीस ठाण्याच्या स्तरावर सर्वेक्षण करण्याचा सूचना सर्व पोलीस ठाण्यांना पुन्हा दिल्या जातील. या सूचना पोलिसांच्या ‘गॅझेट’मध्ये प्रकाशित करण्यास सांगितले आहे.