पुण्यातील वानवडी परिसरात एका तरुणीने केलेल्या आत्महत्येवरुन आता भाजपाने सखोल चौकशीची मागणी केली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणासंदर्भात पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन सत्य बाहेर पाढले पाहिजे अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे हे प्रकरण दाब्याचं काम पुणे पोलिसांनी करु नये असंही फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज गेल्या चार वर्षातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापालिकेला भेट दिली. याचनंतर फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांना वानवडी येथील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित एका मंत्र्याचं नाव गोवलं जात असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “मी सुद्धा या प्रकरणाची बातमी वाचली. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. समाज माध्यमांमध्ये काही क्लिप फिरत आहेत असंही मला सांगण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. यामधील सत्य काय आहे हे जनतेसमोर आणलं पाहिजे. एका तरुणीची अशाप्रकारे झालेली आत्महत्या आणि त्याच्या भोवती तयार झालेलं संक्षयाचं वर्तुळ आहे ते दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी करु नये. त्यासंदर्भात सत्य पोलिसांनी बाहेर आणावं,” असं मत व्यक्त केलं.

प्रकरण काय आहे?

मुळची परळीच्या असणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने पुण्यात रविवारी मध्यरात्री आत्महत्या केली. ही तरुणी शिक्षणासाठी आपल्या भावासोबत पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आसपास तिनं महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच या तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं. पण या तरुणीच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मजकूर सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारं निवेदनही भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना दिलं आहे.

…म्हणून फडणवीसांनी दिली महापालिकेला भेट

महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. पक्षाचे तब्बल ९८ नगरसेवक आहेत. महापालिके ची आगामी निवडणूक पुढील वर्षी फे ब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित आहे. केंद्रात भाजपची सत्ता, महापालिकेत स्पष्ट बहुमत आणि वर्षभरापूर्वीपर्यंत राज्यात भाजपचे सरकार असतानाही पक्षाला शहरात योजना, प्रकल्पांना गती देता आली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून के ला जात आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महापौरांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महापालिके त बैठकांचा धडाका सुरू केला आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराकडे लक्ष केंद्रित केले आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतानाच नगरसेवकांशीही फडणवीस संवाद साधला.