डॉ. मुकुंद दातार (संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष)

सध्याच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मालिकांच्या माध्यमातून दूरचित्रवाणीवर दाखविले जाते, तेच आपण सहकुटुंब पाहतो. मात्र, ती मालिका बघितल्यानंतर त्यावर चिंतनात नाही तर केवळ चच्रेतच वेळ दवडला जातो. या उलट, पुस्तके ही त्या लेखकाच्या मनाच्या मुशीतून जीवनाचा अर्थ सांगण्याचे काम करतात. वाचनातून आपण जीवनानुभवाने संपन्न होतो. असाच काहीसा अनुभव घेत, माझ्या वाचनप्रवासात ज्ञानेश्वरी, भगवद्गीता अशा नानाविध ग्रंथांचे परिपूर्ण वाचन करताना ब्रह्मानंदाकडे जाण्याची पाऊलवाट दृष्टीस पडल्याचा आनंद मी घेतला.

माझे आजोबा (वेदशास्त्रसंपन्न वामनकृष्ण उर्फ पंडितराव) हे कोल्हापूरमधील कुरुंदवाड या आमच्या मूळ गावी संस्थानिक पटवर्धनांच्या राजवाडय़ातील खासगी गणपतीचे पुजारी होते. परंतु १९१२-१३च्या सुमारास लोकमान्य टिळक यांनी केलेल्या परदेशी साखर खाऊ नका, या आवाहनास प्रतिसाद देत त्यांनी राजदरबारातील पंगतीमध्ये मी साखर खाणार नाही, असे ठणकावून सांगितले. ते टिळकांचे अनुयायी असल्याने त्यांना ही नोकरी सोडावी लागली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नाटक कंपनीमध्ये ‘बेबंदशाही’ नाटकामध्ये बारा वष्रे उत्तम भूमिका केली. गावामध्ये वैदिक पाठशाळा चालविली. त्या काळी आमच्या घरामध्ये त्यांनी ‘होम लायब्ररी’ या इंग्रजी नावाने ग्रंथालय सुरू केले. दातारवाडय़ात सुरू केलेल्या या ग्रंथालयातून मराठीसह संस्कृत पुस्तकेही वाचकांकरिता उपलब्ध झाली. आजोबांचे हेच वाचनसंस्कार माझ्या वडिलांवर (रघुनाथ) झाले. ना. सी. फडके हे माझ्या वडिलांचे गुरू. ते संस्कृत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे माझ्यावर लहानपणापासून कळत नकळत पुस्तके आणि वाचनाचे संस्कार होत होते.

वयाच्या दहाव्या वर्षांपासून मी कुरुंदवाडमधील नगर वाचन मंदिरात जात असे. तेव्हापासून ग्रंथ हेच माझे दोस्त. माझ्या मुंजीमध्ये मला अकबर-बिरबलाचे पुस्तक भेट म्हणून मिळाले. त्यानंतर पुस्तके विकत घ्यावी, असे वाटत होते, मात्र आमची आíथक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने ज्या गावामध्ये जाईन, तेथील ग्रंथालयात जाऊन मी वाचन करायचे ठरविले. आमच्या गावी असलेल्या लेले गुरुजींमुळे मला ग्रंथालय उघडल्यापासून रात्री बंद होईपर्यंत बसायला मिळत होते. त्यामुळे साने गुरुजी यांची पुस्तके, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची किल्ल्यांची नावे असलेली दहा छोटेखानी पुस्तके, नाथमाधव यांचे साहित्य, वि. वा. हडप यांचे ‘पेशवाई’ या पुस्तकांमुळे मला इतिहासाविषयी झपाटून टाकले. या इतिहासप्रेमामुळेच मला एसएससीमध्ये १०१ रुपयांच्या बक्षिसासह प्रथम क्रमांक मिळाला. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान मी मराठीकडे आकर्षति झालो. त्या काळात केशवसुत, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज यांच्या कविता आणि साहित्याने मला वाचनाची दिशा दाखविली. रत्नागिरीला बी. ए. आणि कोल्हापूरला एम. ए. पूर्ण केले. त्या काळातही स्थानिक ग्रंथालयांमध्ये वाचन सुरूच होते.

इतिहासानंतर मराठीकडे माझा ओढा अधिक वाढला तो शाळेतील आप्पा माने मास्तरांमुळे. ‘चंद्रशेखर कवींचे काय हो चत्मकार’ या खंडकाव्याची गोष्ट त्यांनी संपूर्ण दिवसभर उदाहरणांसह सविस्तरपणे शिकविली. त्या भारावलेपणातून माझ्या मनात मराठीची बीजे रोवली गेली. पुढे मी प्राध्यापक झाल्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडत होती. वारणानगर येथे १९६६ मध्ये यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली. ४० वर्षांच्या काळात मी मराठीसह संस्कृतचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले. त्यामध्ये वाचनाला प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम राबविण्याचा मी प्रयत्न केला. वारणा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सांगली आणि कोल्हापूरमधील ५२ गावांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याकरिता मी पुढाकार घेतला. चार भिंतींमधील प्राध्यापकी करण्यापेक्षा लोकशिक्षकाचे काम करणे मला आवडत होते. त्यामुळे ग्रंथालयासोबतच ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये सुरू करण्याचा मी आग्रह धरला. आजूबाजूच्या महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापकांना बोलावून संतसाहित्याविषयी व्याख्यानाचा उपक्रमही त्यामध्ये अंतर्भूत केला. १९८१ मध्ये ‘संत एकनाथांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व’ या विषयावर मी प्रबंध लेखन केले. त्या वेळी संतसाहित्याविषयीचे समग्र वाचन सुरू झाले. वारणा महाविद्यालयात वाचनकक्ष हा वेगळा उपक्रम राबविण्याचा मी प्रयत्न केला. वाचनकक्षात पाठय़पुस्तकांसोबतच विज्ञान, वणिज्य आणि कला क्षेत्रातील नामवंतांची चरित्रात्मक पुस्तके ठेवण्याकरिता मी पुढाकार घेतला.

अनेकदा पुण्याला येऊन अशा पुस्तकांची खरेदीदेखील केली. या दरम्यान, नारायण सुर्वे, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज यांच्या साहित्याचे सखोल वाचनही सुरू होते. माझ्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही अवांतर वाचनाने आपल्या विचारांच्या कक्षा रुंद कराव्यात आणि पुस्तकांच्या सहवासात रमण्याचा आनंद लुटावा, हीच काय ती त्यामागची इच्छा. तब्बल ४० वर्षांच्या कालावधीत सुरुवातीला प्राध्यापक व नंतर प्राचार्यपदी काम करून मी निवृत्त झालो. डॉ. हे. वि. इनामदार हे माझे पीएच.डी.चे परीक्षक होते. त्यांच्या सल्ल्याने आणि मदतीने मी पुण्यामध्ये आलो. पुण्यातील विविध ग्रंथालयांमध्ये मी आठवडय़ातून तीन दिवस तरी येत असे. नंतर काही वर्षांतच पुण्यामध्ये स्थायिक झालो आणि २००३ मध्ये गीता धर्म मंडळात कामाला सुरुवात झाली.

मंडळात २००७ मध्ये ‘गीतादर्शन’ मासिकाच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारून तीन वष्रे जोमाने काम केले. २०१० मध्ये मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा आली. मंडळाचे संस्थापक भिडेशास्त्री यांनी उपनिषदांवर लिहिलेल्या दहा खंडांचा विचार पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाचकांसमोर पोहोचविण्याकरिता ‘उपनिषदांची गीताधर्मी शिकवण’ हे पुस्तक लिहिण्याचे माझे स्वप्न आहे. यापूर्वी माझ्या लेखनप्रवासात अनेक टप्पे आले. त्यामध्ये अभिरुची मासिकामध्ये कथाकविता, मनोरमा मासिकातील अनेक लेख मी लिहिले, मात्र १९९० नंतर मी पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. ‘मध्ययुगीन धर्मसंप्रदायी वाङ्मय’ हा संपादित ग्रंथ साकारताना डॉ. यु. म. पठाण, उषा देशमुख यांच्यापर्यंत अनेकांच्या गाठीभेटी घेत लेखांचे संलकन केले. यानिमित्ताने माझा तब्बल १५ संप्रदायांचा कळत नकळत अभ्यास झाला. ‘ज्ञानेश्वरी- १२वा अध्याय’, ‘वेचक एकनाथी अभंग’, ‘सरिता-सुधा’, ‘संतकवी एकनाथ’, ‘तुका म्हणे’, ‘भावमुद्रा’, ‘स्मरण केशवसुतांचे’, ‘वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी’, ‘वारकरी-विश्व आणि समर्थ रामदास’, ‘एकनाथांची बोधवाणी’, ‘भगवद्गीता काय शिकवते?’ अशा अनेक पुस्तकांचे माझ्या हातून लेखन झाले. माझ्या वाचन आणि लेखनप्रवासात पुणे नगर वाचन मंदिर, पुणे मराठी ग्रंथालय, गीता धर्म मंडळ ग्रंथालय, मातृस्मृती ग्रंथालयाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गीता धर्म मंडळामध्ये गीता आणि ज्ञानेश्वरीविषयी मराठी, िहदी, इंग्रजी भाषेतील

सर्व प्रकारचे साहित्य एकत्र करण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी मी अनेकांना आवाहन केले असून, जबलपूर येथून वैद्य नावाच्या एका व्यक्तीने वृत्तपत्रातील ज्ञानेश्वरीच्या कात्रणांचा केलेला २० खंडांचा संग्रह गीता धर्म मंडळास मिळाला आहे. ही जीवनानंद देणारी शिदोरी भविष्यात वाढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.