वळवाच्या पावसात कमकुवत वीजयंत्रणेचे पितळ उघडे; पुण्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा होत असलेल्या राज्यातील सर्व विभागांच्या तुलनेत सर्वाधिक वीजबिल भरणारे शहर म्हणून लौकिक असलेल्या पुणेकरांच्या वाटय़ाला अद्यापही अखंड वीजपुरवठय़ाचे सुख नाही. हलका वारा आणि छोटासा पाऊस आला, तरी विजेचा खेळखंडोबा मात्र मोठा होत असल्याचे चित्र आहे. वळवाच्या पहिल्याच पावसामध्ये निम्म्याहून अधिक शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे वीजपुरवठय़ावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी शहरातील कमकुवत वीजयंत्रणेचे पितळ या निमित्ताने पुन्हा उघडे झाले.

पुणे विभागात विजेची गळती सर्वात कमी आहे. त्यामुळे वसुली सर्वाधिक असल्याने पुणे शहराला ‘ए प्लस’ हा सर्वोच्च दर्जा मिळाला आहे. राज्यात विजेच्या उपलब्धतेची गंभीर स्थिती निर्माण झाल्यास वीजकपात करण्याच्या क्रमवारीत पुणे शहर सर्वात शेवटी आहे. त्यामुळे अधिकृत वीजकपात नसली, तरी यंत्रणेतील दोषामुळे पुणेकरांना अखंड वीज मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे. १२ मे रोजी वारा सुटून पावसाचा हलकासा शिडकाव झाला, तर १३ मे रोजी शहरात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच वळवाच्या पावसामध्ये शहरातील वीजयंत्रणेने मान टाकली. महापारेषण कंपनीची चार वीज केंद्र बंद पडली. त्यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा बंद झाला. यासह विविध भागांमध्ये स्थानिक पातळीवर यंत्रणेत बिघाड होऊन वीज खंडित झाली.

जोरदार पावसाळा सुरू झाल्यानंतर वीजयंत्रणेची स्थिती काय असेल, याचे उत्तर वळवाच्या पावसात मिळाले आहे. त्यामुळे कमकुवत यंत्रणेसह पावसाळापूर्व देखभाल- दुरुस्तीचा मुद्दाही पुन्हा समोर आला आहे. वळवाचा पाऊस वादळ-वाऱ्यांसह याच कालावधीत येतो, याची कल्पना असतानाही पुरेशी खबरदारी का घेतली जात नाही, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. जुनाट ट्रान्सफॉर्मर, वाहिन्या, अयोग्य क्षमतेच्या वीजवाहिन्या त्याचप्रमाणे तांत्रिक दोष यामुळे ही स्थिती निर्माण होत असून, याबाबत ग्राहकांकडून तीव्र संताप व्यक्त होतो आहे.

विद्युत समिती नेमके करते काय?

वीजस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना योग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने विद्युत कायद्यानुसार पुणे शहर व जिल्ह्यासाठी एक विद्युत समिती आहे. ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या विजेचा दर्जा, ग्राहकाचे समाधान, तसेच विद्युतीकरणाच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्याचे काम या समितीकडे असते. जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदार या समितीचे अध्यक्ष असतात. त्यानुसार सध्या शिवाजीराव आढळराव पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीने वेळोवेळी बैठका घेऊन कामांचा आणि नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेणे अपेक्षित आहे. मात्र, सद्य:स्थितीत अनेक दिवस या समितीची बैठकच होत नाही. बैठक झालीच तर काहीही ठोस केले जात नसल्याचे वास्तव आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू असताना ही समिती नेमके करते काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यंत्रणा सक्षमीकरणाच्या ६०० कोटींच्या प्रकल्पाचा तिढा

वीजयंत्रणेचे सक्षमीकरण आणि पुरेशी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने सहाशे कोटी रुपयांचे प्रकल्प शहरात प्रस्तावित आहेत. संबंधित योजनेतील इतर शहरातील कामे सुरू होऊन ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, पुण्यात खोदकामाच्या तिढय़ामुळे ही कामे प्रलंबित आहेत. यंत्रणेसाठी कराव्या लागणाऱ्या खोदकामासाठी देण्यात आलेला प्रस्ताव पालिका आयुक्तांकडून मान्य केला जात नसल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच सांगितले होते. यंत्रणेसाठी खोदकाम केल्यानंतर रस्ते पूर्वीप्रमाणे करून दिले जातील. या कामाचे चित्रीकरण केले जाईल. पूर्ववत केलेल्या रस्त्याबाबत पालिकेची नाहरकत मिळाल्याशिवाय प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल दिले जाणार नाही. असा हा प्रस्ताव आहे.