देशातून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची निर्यात केली जात असली तरी निर्यातीसाठी लागणाऱ्या कंटेनरचे भाडे चार ते पाचपटीने वाढले आहे. अन्यही खर्चात वाढ झाल्यामुळे निर्यात खर्चातही वाढ सुरू झाली आहे. निर्यात खर्चात अशीच वाढ  होत राहिल्यास त्याचा परिणाम निर्यातीवर होणार असल्याचे स्पष्ट  झाले आहे.

देशातून तांदूळ, आटा, धने, जिरे, साखर, गहू, खसखस आदीची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. मसाल्याच्या पदार्थांचीही निर्यात होते, अशी माहिती मार्केट यार्ड भुसार बाजारातील प्रमुख निर्यातदार तांदूळ व्यापारी, जयराज आणि कंपनीचे संचालक धवल शहा यांनी दिली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग वाढीस लागला. त्यानंतर लगेच टाळेबंदी लागू करण्यात आली. भारतातून अन्नधान्याची निर्यात सागरी मार्गाने होते. करोनाकाळात भारतातून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची निर्यात करण्यात आली. भारतातून अमेरिका तसेच अन्य देशांत कंटेनरमधून निर्यात करण्यात येते.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात अमेरिकेला पाठविण्यात येणाऱ्या एका कंटेनरचे भाडे १३०० ते १४०० डॉलर होते. त्या वेळी कंटेनरची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होती. नोंदणी केल्यानंतर त्वरित कंटेनर निर्यातीसाठी उपलब्ध व्हायचे. सध्या कंटेनर उपलब्ध होत नाहीत. तसेच कंटेनरचे भाडे १३०० ते १४०० डॉलरवरून पाच ते साडेपाच हजार डॉलरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक भाडे चार ते पाचपटीने वाढले आहे. अन्नधान्याचे प्रति क्विंटल वाहतूक भाडे दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. निर्यात खर्चात वाढ झाल्याने निर्यातीस पाठविण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे दर प्रति किलोमागे वीस रुपयांनी वाढले आहेत.

मार्च २०२० मध्ये जो माल ८० रुपये प्रति किलोने परदेशात विकला जात होता, तो पाठविण्यासाठी प्रति किलो ८५ रुपये खर्च येत होता. आता वाहतूक खर्च वाढल्याने ८५ रुपयांवरून हा खर्च शंभर रुपयांवर गेला आहे. त्यामुळे परदेशातून मागणी कमी होत आहे. साधारणपणे एका किलोमागे २० रुपये नुकसान व्यापाऱ्यांना सोसावे लागत आहे. एका कंटेनरमधून २० टन अन्नधान्य पाठविले जाते.

सागरी मार्गाने चीन, अमेरिका, युरोपात गेलेले कंटेनर अद्याप परत न आल्याने सध्या कंटेनरची कमतरता जाणवत आहे. कंटेनरच्या भाड्यात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने भाडेवाढीकडे लक्ष द्यावे तसेच कंटेनरही उपलब्ध करून द्यावेत. याकडे दुर्लक्ष झाले तर अन्नधान्य उपलब्ध असूनही निर्यात रोडावेल.

– धवल शहा, बासमती तांदूळ निर्यातदार, मार्केट यार्ड