सव्वाशे कोटी रुपये खर्च करूनही कात्रज ते हडपसर या मार्गावरील बीआरटी अक्षरश: ‘फेल’ झाली आहे आणि तुमच्या नियोजनशून्य कारभारामुळेच बीआरटीचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी मुख्य सभेत प्रशासनावर कोरडे ओढले. बीआरटीबाबत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी तारांबळ उडाली.
बीआरटीच्या प्रयोगावर आतापर्यंत १२७ कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि या मार्गावर शेकडो अपघात झाले आहेत. बीआरटीमुळे सोलापूर आणि सातारा रस्त्याचीही वाट लागली आहे. नियोजनाच्या अभावामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे, अशा हरकती घेत संजय बालगुडे यांनी मुख्य सभेत या प्रश्नाला गुरुवारी तोंड फोडले. त्यानंतर आबा बागूल, अविनाश बागवे, दत्ता धनकवडे, किशोर शिंदे, मनीषा चोरबेले, प्रा. मेधा कुलकर्णी, शीतल सावंत, मीनल सरवदे, सतीश म्हस्के, शिवलाल भोसले आदींनी प्रश्नांचा भडीमार करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बागवे यांनी सातारा रस्त्यावरील अनेक समस्या यावेळी मांडल्या.
बीआरटीच्या फसलेल्या योजनेमुळेच काँग्रेससारखा चांगला पक्ष खड्डय़ात गेला. या योजनेबाबत कोणतेही नियोजन नाही. योजनेची जबाबदारी असलेले अधिकारी श्रीनिवास बोनाला हे अत्यंत बेजबाबदारपणे काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार काढून घ्या आणि खात्याची जबाबदारीही काढून घ्या, अशी मागणी यावेळी आबा बागूल यांनी केली. नगर रस्ता आणि आळंदी रस्त्यावरील बीआरटीच्या समस्यांबाबत त्या भागातील नगरसेवकांनी अनेक तक्रारी केल्या.
भुयारी मार्गात गाळे
सातारा रस्त्यावर जे भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत त्यात दुकानदारांसाठी गाळे बांधले जाणार आहेत का, असा उपरोधिक प्रश्न प्रा. मेधा कुलकर्णी यांनी सभेत विचारला आणि तेथे खरोखरच गाळे बांधले जाणार असल्याचे उत्तरातून स्पष्ट झाले. त्यामुळे भुयारी मार्ग गाळ्यांसाठीच बांधला जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.
नगरसेवकांच्या आक्षेपांना आणि प्रश्नांना अतिरिक्त नगर अभियंता बोनाला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. बीआरटीच्या प्रश्नांबाबत न बोलता ते योजनेची माहिती देऊ लागताच सदस्य त्यांच्यावर संतापले. योजनेची कथा ऐकवू नका, उपाययोजना काय करणार ते सांगा, असे सांगत बालगुडे यांनी बोनाला यांच्या उत्तरांना हरकत घेतली. त्यानंतर आयुक्त महेश पाठक यांनीही बीआरटीबाबत सविस्तर खुलासा केला. मात्र, त्यानेही सदस्यांचे समाधान झाले नाही. आयुक्त विद्वान असल्यामुळे मुद्दा पटवून देण्यात ते पटाईत आहेत, अशी भावना शिवलाल भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
आयुक्तांचा धमकीवजा इशारा
देशात सर्वप्रथम बीआरटी योजना पुणे शहरात सुरू झाली आहे. त्यासाठी आतापर्यंत केंद्राकडून ६७० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. बीआरटीला विरोध केल्यास केंद्राला ८०० कोटी रुपये परत करावे लागतील. तशी तयारी ठेवा, असा धमकीवजा इशारा यावेळी आयुक्त महेश पाठक यांनी यावेळी सदस्यांना दिला. पुणेकरांना वाहतूक शिस्त नाही. त्यासाठी स्वयंशिस्ती बरोबरच आयटीएस, पे अॅन्ड पार्क या योजनाही शहरात राबवल्या पाहिजेत, असेही प्रतिपादन आयुक्तांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2013 रोजी प्रकाशित
तुमच्या नियोजनशून्येमुळेच बीआरटीचा बोजवारा उडाला
सव्वाशे कोटी रुपये खर्च करूनही कात्रज ते हडपसर या मार्गावरील बीआरटी अक्षरश: ‘फेल’ झाली आहे आणि तुमच्या नियोजनशून्य कारभारामुळेच...
First published on: 22-11-2013 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Failure of brt because of your unplanned work