भूमिगत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा मार्ग मोकळा

भूमिगत मेट्रोच्या फडके हौद ते स्वारगेट या दुसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. येत्या दोन वर्षांत भूमिगत मेट्रोचे काम पूर्ण होण्याची शक्यता असून या मार्गिकेमध्ये २.३७ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. टाटा गुलेरमार्क या कंपनीकडून हे काम होणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारेगट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून सुरू आहेत. यातील वनाज ते रामवाडी ही मार्गिका उन्नत स्वरूपाची असून पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचा काही भाग भूमिगत आहे. शेतकी महाविद्यालयापासून स्वारगेटपर्यंतचा हा एकूण ५.१९ किलोमीटर लांबीची भूमिगत मेट्रो मार्गिका असणार आहे. भूमिगत मेट्रोच्या कामाच्या अनुषंगाने दोन कंपन्यांना दोन टप्प्यात ही कामे करण्यास महामेट्रोने मान्यता दिली आहे.

मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गेल्या आठवडय़ात करण्यात आले आणि शेतकी महाविद्यालय ते फडके हौद चौक या पहिल्या टप्प्याच्या कामाला प्रारंभ झाला. त्यानंतर टाटा गुलेरमार्क या कंपनीला फडके हौद ते स्वारगेट या मार्गिकेचे काम देण्यात आले. या भूमिगत मेट्रो मार्गिकेची लांबी ४.७४ किलोमीटर असून यात २.३७ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. फडकै हौद, मंडई, स्वारगेट येथे भूमिगत मेट्रो स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी एक हजार १६० कोटी रुपयांचा खर्च येणार त्यासाठी असून दोन टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

फडकै हौद ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेतील स्थानकांमुळे २९६ प्रकल्पग्रस्त बाधित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठीचा आराखडा महामेट्रोने काम सुरू करण्यापूर्वी निश्चित केला होता. त्यानुसार मंडई, फडके हौद परिसरातील पाच ठिकाणी पुनर्वसनाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या जागांवर आठ मजली इमारती बांधण्यात येणार असून पुनर्वनस करताना मिळकतींच्या क्षेत्रफळानुसार विविध चौरस फुटांच्या निवासी सदनिका महामेट्रोकडून उभारण्यात येणार आहेत. तसेच १०६ व्यावसायिक गाळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

भूमिगत मेट्रोचे काम वेगात पूर्ण व्हावे यासाठी कामाची विभागणी करण्यात आली आहे. त्यासाठी महामेट्रोकडून स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात शेतकी महाविद्यालय ते फडकै हौद आणि दुसऱ्या टप्प्यात फडके हौद ते स्वारगेट अशी कामे होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील भूमिगत मेट्रोचे काम वेगात व्हावे, यासाठी स्वारगेट येथे शाफ्ट (मोठे खड्डे) खोदण्याचे काम महामेट्रोकडून सुरू करण्यात आले आहे.