घाटांवर सीसीटीव्ही, वैद्यकीय पथके, स्वतंत्र कुंड

गणेशोत्सव आला आणि आठ दिवस कधी गेले, ते लक्षातही आले नाही. आता सार्वजनिक मंडळांकडून विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. पिंपरी महापालिका तसेच शहरातील पोलीस यंत्रणाही त्या कामाला लागली आहे. अनंत चतुर्दशी व त्याच्या आदल्या दिवशी (४ व ५ सप्टेंबर) होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी ठेवण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. गणेश मंडळाच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी महापालिकेकडून तीन ठिकाणी स्वागत कक्ष उभारले जातात. भोसरीतील गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी करण्यात येते. त्यासाठी भोसरीतील पीसीएमसी चौकात पालिकेच्या वतीने मंडप उभारण्यात येणार आहे, तर शेवटच्या दिवशी चिंचवडच्या चापेकर चौकात व पिंपरीतील कराची चौकात स्वागत कक्ष राहणार आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी घाटांवर आवश्यक ध्वनिक्षेपण व विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. घाटांवर मोठे प्रकाशझोत असणार आहेत. जागोजागी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. वैद्यकीय पथक तसेच रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. मोकाट जनावरे रस्त्यावर असणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मूर्तीदान व निर्माल्यदान करण्यासाठी स्वतंत्र कुंडांची व्यवस्था राहणार आहे. नदी परिसरात जीवरक्षक नियुक्त केले आहेत. पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.