पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यातील अंतर खूप असल्यामुळे पोलीस ठाण्यातील माहिती मुख्यालयात पाठविण्यास बराच अवधी जातो. मात्र, आता पुणे जिल्ह्य़ातील सर्वच पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, तक्रारीची नोंद प्रत्येक पोलीस ठाण्यात व ग्रामीण पोलीस मुख्यालयात बसून पाहता येणे शक्य होणार आहे. कारण जिल्ह्य़ातील सर्वच पोलीस ठाणी संगणकावरून ‘गो लाइव्ह’ या प्रणाली अंतर्गत जोडण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला जिल्ह्य़ातील दहा पोलीस ठाणी या प्रणाली अंतर्गत जोडण्यास सुरुवात झाली आहे. या आधुनिक प्रणालीमुळे पोलिसांचे कार्यालयीन कामकाज सोपे होणार आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांचा विस्तार मोठा असून एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जाण्यास काही तास लागतात. त्यामुळे जिल्ह्य़ातील प्रत्येक पोलीस ठाणे संगणकीकृत करून ती सतत पोलीस अधीक्षक कार्यालयासह एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ‘गो लाइव्ह’ ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर जेजुरी, बारामती शहर, वडगाव िनबाळकर, वेल्हे, घोडेगाव, शिरूर, मंचर, लोणावळा शहर, आळंदी व दौंड या दहा पोलीस ठाण्यांत प्रथम सुरू करण्यात आली आहे. यासाठी या पोलीस ठाण्यातील पोलिसांना पुणे येथील मुख्यालयात पाच दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून सर्वाना ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ मिळणार आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्यातील घटना, गुन्हा, अपघाताची माहिती, आरोपींची माहिती, बंदोबस्ताची माहिती एकाच वेळी सर्वच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अगदी साधा अदखलपात्र गुन्हा अथवा फिर्याद नोंदली, की गो लाइव्ह प्रणालीतून जिल्ह्य़ातील कोणत्याही पोलीस ठाण्यात पोहोचणार आहे. यामुळे गुन्ह्य़ांच्या तपास कामात मोठा उपयोग होणार आहे. याशिवाय पत्रव्यवहार, विविध दाखले त्वरित उपलब्ध होणार आहेत. या दहा पोलीस ठाण्यातून राबविण्यात येणाऱ्या प्रणालीचा अनुभव घेऊन आवश्यक सुधारणा करून लवकरच जिल्ह्य़ातील सर्वच पोलीस ठाण्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे. आयएसओ नामांकन मिळण्याच्या दृष्टीने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस खात्याची ही वाटचाल सुरू झाली असून, पोलीस ठाण्यात आता अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.