“मराठ्यांच्या वैध आरक्षणाचा महाविकासआघआडी सरकारनं खून केला.” अशी टीका मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे. पुण्यातील पत्रकारपरिषदेद्वारे मराठा क्रांती मोर्चाकडून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं. “मागणी नसताना EWS आरक्षण देऊन सरकारने मराठ्याची फसवणूक केली.” असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे.

मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाकडून आता जोरदार टीका केली जात आहे.

“राज्य सरकारने ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ देण्याचा निर्णय घेतल्याने, काहीजण राजकारण करत आहेत”

“EWS आरक्षण द्या अशी सार्वजनिक मराठा समजाची कधीही मागणी नव्हती. EWS आरक्षण देऊन जे महत्वपूर्ण आरक्षण आहे, त्याचा खून करण्याचं काम या महाविकासआघाडी सरकारने केलेलं आहे. ही मराठ्यांची खूप मोठी फसवणूक या महाविकासआघाडी सरकारने केलेली आहे.” असं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आलं आहे.

मराठा समाजाला EWS चा लाभ, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

तसेच, “विशेष म्हणजे ४२ तरुणांनी ज्या आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांचा अपमान देखील या महाविकासआघाडी सरकारने केलेला आहे. गायकवाड आयोगाचा अपमान देखील केला गेला आहे. ते सांगतात की, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही जर का EWS आरक्षण दिलेलं असेल, तर उच्च न्यायालयानेच गायकवाड आयोगाने दिलेले आरक्षण वैध ठरवलेलं आहे ना? मग येत्या २५ जानेवारीला जर याबद्दलची स्थगिती उठवण्याची वेळ जवळ आलेली आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी, मध्येच EWS आरक्षण देऊन, जे व्यापक स्वरूपात व अधिकृतरित्या महत्वाचं आरक्षण मिळणार आहे. त्याचा अवसान घात करण्याचं काम या महाविकासआघाडी सरकारने केलेलं आहे. मराठ्यांच्या पाठीत या महाविकासआघाडी सरकारने खंजीर खुपसलेला आहे.” अशी जोरदारा टीका देखील मराठा क्रांती मोर्चाकडून महाविकासआघाडी सरकारवर करण्यात आलेली आहे.

आरक्षणाच्या निर्णयाचं काय होईल? याबाबत सरकारला विश्वास दिसत नाही – दरेकर

तसेच, २५ जानेवारी रोजी होणार्‍या सुनावणीत मराठा समाजाचा घात झाल्यास, या पुढील काळात निघणारे मोर्चे शांततेच्या मार्गाने निघणार नाहीत. एवढं सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी यावेळी दिला.

या पत्रकारपरिषदेत श्रीमंत कोकाटे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, राष्ट्र सेवा समूहाचे राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, उत्तम कामठे, मराठा महासंघाचे अनिल मारणे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या शशिकला भोसेकर आदींची उपस्थिती होती.