मार्केटयार्डातील फळबाजारात दररोज दोन ते अडीच टन द्राक्षांची आवक

द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्यात आला आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्य़ातून होणारी द्राक्षांची आवक कमी झाली असून बाजारात सध्या सोलापूर जिल्ह्य़ातील द्राक्षांची आवक सुरू आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील द्राक्षांची आवक आणखी पंधरा ते वीस दिवस सुरू राहील.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळबाजारात सध्या दररोज दोन ते अडीच टन द्राक्षांची आवक होत आहे. द्राक्षांना मागणी चांगली आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. द्राक्षांचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला. सुरुवातीला द्राक्षांची आवक तुरळक होत होती. जानेवारीनंतर आवक वाढली. उन्हाचा कडाका वाढल्याने द्राक्षांची गोडी वाढली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांची आवक चांगली राहिली. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचा तसेच गारपिटीचा फटका द्राक्षांना बसला. यंदा पाणीटंचाईमुळे द्राक्ष बागायतदारांना झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करावे लागले, असे फळबाजारातील व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

यंदा द्राक्षांची हंगामातील सर्वोच्च आवक १०० टनापर्यंत पोहोचली होती. जवळपास महिनाभर द्राक्षांचा हंगाम बहरात होता. सध्या बाजारात माणिक चमन आणि सुपर सोनाका द्राक्षांची आवक सुरू आहे. माणिकचमन द्राक्षांना (१५ किलो) ७०० ते १००० रुपये असा दर मिळाला आहे. सुपर सोनाका जातीच्या द्राक्षांना (१५ किलो) १००० ते १३०० रुपये असा दर मिळाला आहे. पुढील पंधरा ते वीस दिवस द्राक्षांची आवक सुरू राहील. घरगुती ग्राहक, किरकोळ विक्रेते तसेच ज्युस विक्रेत्यांकडून यंदा चांगली मागणी राहिली, असेही मोरे यांनी सांगितले.

यंदा दोन एकरांवर द्राक्ष बागेची लागवड केली. हंगामात सात ते साडेसात लाख रुपये उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी पाऊण एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग होती. त्यावेळी पावणेचार लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. एकंदरच यंदाचा हंगाम साधारण झाला.   – हरिदास कदम, द्राक्ष बागायतदार, कवठेमहांकाळ, जि. सांगली

यंदा द्राक्षांचा हंगाम चांगला झाला. द्राक्षांची प्रतवारी चांगली होती तसेच उत्पादनात वाढ झाली होती. प्रतवारी चांगली असल्याने दरही चांगले मिळाले. यंदा चार एकरांवर द्राक्ष लागवड केली. त्यासाठी आठ लाख रुपये खर्च आला. चार एकरांमध्ये यंदा चांगले उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी हवामानातील बदलांचा द्राक्ष उत्पादनावर मोठय़ा प्रमाणावर परिणाम झाला होता.    – मदन शिंदे, द्राक्ष बागायतदार, बारामती, जि. पुणे