चाकण येथील मेफेड्रोन ड्रग्स च कनेक्शन थेट गुजरात पर्यंत पोहचलं आहे. या प्रकरणी गुजरात येथून तीन तर मुंबईमधून तीन जणांना असे एकूण सहा जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, गुजरात येथून अटक करण्यात आलेले आरोपी हे केमिकल कंपनी स्थापित करून त्या नावाखाली मेफेड्रोन ड्रग्स बनवणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र, त्या आधीच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुजरातच्या वडोदरा येथे साध्या वेषात जाऊन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोन ड्रग्स सापडले होते. याचा थेट त्याच्याशी संबंध असण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

याप्रकरणी परशुराम जोगल, मंदार भोसले, राम मनोहरलाल गुरबानी यांना मुंबईमधून तर मनोज एकनाथ पलांडे, अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे आणि अफजल हुसेन अब्बास सूनसरा यांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत याप्रकरणी वीस जनांना पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे एका मोटारीतून २० कोटींचे २० किलो मेफेड्रोन ड्रग्स घेऊन जात असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून पकडले होते. या प्रकरणी आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपिकडून  85 लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली असून ७५ लाखांच्या जमिनीची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केलेली आहेत. या प्रकरणी छोटा राजन टोळीच्या हस्तकाचा यात सहभागी असल्याचं समोर आलं असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुजरात येथे या प्रकरणाशी संबंधित आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले तिथे स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ आणि पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी वेषांतर करून इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने गुजरात मधील वडोदरा येथून आरोपींना अटक केली आहे.

गुजरात येथील अंकलेश्वर येथे केमिकल कंपनी उभी मेफेड्रोन बनवणार होते

गुजरातमधील अंकलेश्वर येथे केमिकल कंपनी उभारणार होते. मुख्य आरोपी अफजल आणि पलांडे या दोघांनी मोठ्या प्रमाणावर पैसे लावले होते. यासाठी अरविंदकुमार हा मेफेड्रोन बनविण्यासाठी विशेष प्रशिक्षण देणार होता. अगोदर देखील त्याने ३५ लाख रुपये हे केवळ मेफेड्रोन बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी घेतले होते. तो त्यातील मास्टरमांड आहे असं पोलिसांनी सांगितले आहे.