बनावट मतपत्रिका, सरकारी अधिकाऱ्याची नाटय़ परिषदेच्या उपाध्यक्षपदावर झालेली नियुक्ती, बोधचिन्हातील (लोगो) बदल, चुकीचा सभा वृत्तान्त या मुद्दय़ांवरून नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली. मात्र, आगामी नाटय़संमेलनाचे स्थळ निश्चित होऊ शकले नाही. पाहणी करून ऑक्टोबपर्यंत स्थळ निश्चित करू, असे सांगत नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सर्वानुमते नियुक्ती व्हावी, असा विचार मांडण्यात आला. पुणे नाटय़परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने इतर विषय संपले आहेत, अशी टिप्पणी करून ही बैठक संपविण्यात आली.
नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक प्रथमच मुंबईबाहेर िपपरी येथे पार झाली. परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. उपाध्यक्ष प्रमोद भुसारी, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, भाऊसाहेब भोईर, सुनील वणजू हे पदाधिकारी उपस्थित होते. पायाभूत सुविधा, नाटय़परिषद आपल्या दारी व शासनाशी समन्वय अशी त्रिसूत्री ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारयाद्यांचे संगणकीकरण, सर्व शाखांचे लेखापरीक्षण करण्यात येईल. सप्टेंबरमध्ये नाटय़ परिषद शाखांची कार्यशाळा होईल. रंगकर्मीचा आरोग्य विमा काढण्यात आला असून मुंबईतील विविध रुग्णालयांशी बोलणी झाली आहे. यशवंत नाटय़संकुलाचे नूतनीकरण करत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच कोटींची देणगी जाहीर केली, त्यापैकी तीन कोटी ७५ लाख रुपयांचा निधी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर झाला आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
आगामी नाटय़संमेलनासाठी नागपूर, सातारा व पंढरपूर येथे पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ नये, ते मानाचे पद असून सर्वाशी विचारविनिमय करून नियुक्ती व्हावी, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. मात्र, त्याचे खंडन करण्यात आले. बनावट मतपत्रिकांचा विषय दडपण्याचे काही कारण नाही, पोलीस त्यांचे काम करत आहेत. शासकीय अधिकारी नाटय़परिषदेच्या कार्यकारिणीवर बसू शकतो, बोधचिन्ह बदलण्यावरून काही वाद झाला नाही. बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, असा दावा या वेळी करण्यात आला.
‘भावना वेगळी व कायदा वेगळा’
पुण्यात नाटय़परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून एक जुलैला पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. काही मयत व्यक्तींची नावे यादीत आहेत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांकडून ती माहिती नाटय़परिषदेला कळवणे अपेक्षित होते. यासंदर्भात, भावना व कायदा वेगवेगळा आहे, अशी टिपणी निवडणूक अधिकारी भाऊसाहेब भोईर यांनी या वेळी व्यक्त केली.