बारावीचा निकाल दोन टक्क्य़ांनी घसरला; राज्यात तिसऱ्या स्थानावर
राज्याचा बारावीचा निकाल एका टक्क्य़ाने कमी झाला असताना त्याचा परिणाम पुणे विभागावरही झाला. पुणे विभागाचा निकाल ८९.५८ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात जवळपास दोन टक्क्य़ांनी घसरण झाली आहे. राज्यात यंदाही पुणे विभागाला तिसरे स्थान मिळाले. यंदा निकालात घट झाली असली, तरी प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेची स्थिती मागील वर्षांप्रमाणेच राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल बुधवारी जाहीर केला. पुणे विभागात पुण्यासह सोलापूर आणि नगर जिल्ह्य़ाचा समावेश होतो. या वर्षी पुणे विभागातून २ लाख ३५ हजार ७४७ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २ लाख ३५ हजार ५०२ विद्यार्थ्यांपैकी २ लाख १० हजार ९६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त होते. यंदा मात्र या तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. विभागातील ८५.९० टक्के मुले आणि ९४.३४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विभागातील ९ हजार ०९५ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार ७९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३०.७२ टक्के आहे.
गतवर्षी निकालात वाढ झाल्याने प्रवेशात चुरस निर्माण झाली होती. या पाश्र्वभूमीवर, यंदा प्रथम वर्ष प्रवेशाचे चित्र मागील वर्षांप्रमाणेच राहण्याचा अंदाज प्राचार्यानी व्यक्त केला. यंदा निकालात दोन टक्क्य़ांची घट झाली असली, तरी या निकालावरून काहीशी संदिग्धता निर्माण होत आहे. या वर्षी प्रवेशाची स्थिती साधारणपणे मागील वर्षांप्रमाणेच राहील. कारण, पुण्याबाहेरूनही अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुण्यात दाखल होतात. पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का किती आहे, त्यानुसार जागा कमी जास्त होऊ शकतील. मात्र, या सगळ्याचा विचार करता मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशाची स्थिती फार बदलणार नाही, असे प्राचार्यानी स्पष्ट केले.