आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याच्या शिवसेनेच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेने कोणताही विचार न करता हा घाईघाईत घेतलेला निर्णय असून यामुळे त्यांचेच जास्त नुकसान होणार असल्याचे मत भाजपाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या नेतृत्वाने हा निर्णय घेण्यापूर्वी एकदा आपल्या सर्व खासदार आणि आमदारांशी चर्चा करायला हवी होती. त्यांनी अभ्यास केला असता तर त्यांच्या लक्षात आले असते. शिवसेना गेल्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही, उलट आमचा फायदाच होईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाशी युती केली होती. नरेंद्र मोदींच्या लाटेत युतीमुळे त्यांचे १८ खासदार निवडून आले. त्यांनी २२ जागा लढवल्या होत्या. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या खासदारांची संख्या १२ किंवा १४ च्या वर गेलेली नाही. आता जर त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली तर त्यांना ५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. उलट याचा भाजपाला फायदा होईल. भाजपाने २६ जागा लढवल्या व २२ जागी ते विजयी झाले. सेनेने आमच्याबरोबर युती केली नाहीतर निश्चितच आम्ही ३० हून अधिक जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सेनेन अत्यंत घाईत हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांच्या नेतृत्वाने खासदार श्रीरंग बारणे, चंद्रकांत खैरे, गजानन किर्तीकर यांच्यासारख्यांशी चर्चा करायला हवी होती. कारण तेथील बहुतांश आमदार हे भाजपाचे आहेत. याचा फटका त्यांना निश्चितच बसेल. रायगडमध्येही त्यांचा पराभव होईल, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे सरकार ५ वर्षांचा आपला कालावधी पूर्ण करेन असा विश्वास दावोस येथून व्यक्त केला.