उच्च न्यायालयाची शासनाला सूचना 

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या आणि उपचाराधीन रुग्णांची संख्या पुण्यात अन्य शहरांच्या तुलनेत अधिक असून सध्या पुण्यात एक लाख ४० हजार उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेत ही चिंताजनक स्थिती असून रुग्णसंख्या अशीच वेगाने वाढत असेल तर गेल्या वर्षीप्रमाणे पुण्यात कठोर टाळेबंदी लागू करण्याची सूचना न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

करोना गैरव्यवस्थापनाबाबतच्या याचिकांवरील सुनावणीच्या वेळी राज्यातील उपचाराधीन रुग्णांची जिल्हानिहाय माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सादर केली. त्या वेळी पुण्याची आकडेवारी पाहून खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. उपचाराधीन रुग्णसंख्येच्या बाबतीत पुण्याने मुंबईलाही मागे टाकले आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांचा आकडा ५६ हजार आहे, तर पुण्यात हा आकडा एक लाख १४ हजार आहे. मुंबईच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे, असेही सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगितले. संपूर्ण राज्यात नाही, पण पुण्यासारख्या वेगाने रुग्णसंख्या वाढणाऱ्या भागांमध्ये गेल्या वर्षीसारखी कठोर टाळेबंदी लागू करण्याबाबत विचार करण्याची सूचना न्यायालयाने केली.

उपाय का केले नाहीत?

पुण्यातील रुग्णसंख्या एवढी कशी वाढली, पुणे पालिके ने ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना का केल्या नाहीत, मुंबईत रुग्णसंख्या कशी आटोक्यात आणली याबाबत पुणे पालिका आयुक्तांनी मुंबई पालिका आयुक्तांशी संपर्क साधून याबाबत चर्चा का के ली नाही, अशी विचारणा न्यायालयाने पुणे पालिके च्या वकिलांकडे के ली. त्यावेळी पुण्यात मुंबईसारख्या पायाभूत सुविधा नाहीत तसेच मुंबई पालिकेसारखी खर्च करण्याची क्षमताही नाही, असे पालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आली.

आदेश देण्यास भाग पाडू नका…

अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील पाच शहरांमध्ये टाळेबंदी करण्याचे आदेश दिले होते.  त्याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा याविषयीचा निर्णय राज्य सरकारने घ्यायला हवा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. परिस्थितीचा विचार करता आम्ही राज्य सरकारला टाळेबंदी लागू करण्याबाबत संकेत देत आहोत. त्याचा गांभीर्याने विचार करावा, आम्हाला आदेश देण्यास भाग पाडू नये, असे न्यायालयाने सांगितले.

‘मुंबईची कार्यपद्धती अभ्यासा’

मुंबईत करोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होत असेल तर पुण्यासारख्या शहरातही ते व्हायला हवे. त्यामुळे पुण्यासह इतर पालिकांनी मुंबई महापालिकेकडून करोना व्यवस्थापनाचे धडे घेऊन त्याची अंमलबजावणी करायला हवी.  मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे शहरांच्या पालिकांनी एकसारखी कार्यपद्धती अवलंबावी. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी इतर शहरांच्या महापालिका आयुक्तांसोबत दूरचित्रसंवादाद्वारे चर्चा करून त्यांना मुंबई व्यवस्थापनाबाबत माहिती द्यावी आणि उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे, असे न्यायालयाने सांगितले.