कात्रज ते देहूरोड या बाह्य़वळण महामार्गावर बावधन ते बालेवाडी या टप्प्यात प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित सर्व खात्यांचे अधिकारी व कंपन्यांच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक बोलावून कामे मार्गी लावली जातील, असे आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी सांगितले.
बावधन, बालेवाडी राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित कामांसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी तसेच कंपन्यांचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या एकत्रित पाहणीसाठी शुक्रवारी पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार प्रा. कुलकर्णी यांनी बैठक बोलावणार असल्याची माहिती दिली. त्यांच्या पाठपुराव्याने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या प्रकल्पाचे प्रमुख प्रफुल्ल दिवाण तसेच रिलायन्सचे पुणे विभाग प्रमुख (रस्ते विभाग) रतन प्रकाश, भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष जयंत भावे, सरचिटणीस संदीप खर्डेकर, मंदार घाटे, अमोल डांगे, प्रशांत हरसुले, प्रकाश बालवडकर, अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, विशाल गांधीले, मंजुश्री खर्डेकर आणि परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
चांदणी चौकात सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यात महामार्ग प्राधिकरणाच्या तसेच रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी काम करताना येत असलेल्या अडचणी या वेळी सांगितल्या. मुख्यत्वे केबल, सेवा वाहिन्या यासंबंधी विविध खात्यांकडून परवानगी विषयक अडचणी येत असून भूसंपादनाबाबतही अडचणी येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या कामात येत असलेल्या विविध अडचणी दूर करण्याकरता आमदार प्रा. कुलकर्णी यांनी संबंधित सर्व खात्यांच्या प्रमुखांची एकत्रित बैठक आयोजित करणार असल्याचे या वेळी सांगितले. बैठकीत प्रलंबित कामांबाबत निर्णय घेतले जातील. चांदणी चौकापासून सुरू झालेला हा दौरा बालेवाडी येथे संपला.
महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सेवा रस्त्यांची कामे १५ नोव्हेंबपर्यंत पूर्ण करू, असे या वेळी सांगितले.