शहरातील महाविद्यालय परराज्यातील विद्यापीठाशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत

‘पुण्यात शिका आणि राजस्थानात जाऊन परीक्षा द्या’ अशी योजना एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांपुढे मांडली आहे. एकाच वेळी तीन विद्यापीठांची संलग्नता घेऊन प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेने आता राजस्थानातील विद्यापीठाशी हातमिळवणी करण्याची तयारी केली असून  पूर्णवेळ अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे दाखवायचे आणि त्यानंतर परीक्षेपुरतेच विद्यार्थ्यांनी हजर राहून प्रमाणपत्र द्यायचे, असा गैरप्रकार यामुळे  समोर येत आहे.

नियमानुसार विद्यापीठांमध्ये त्यांच्या निश्चित झालेल्या क्षेत्राबाहेर केंद्र सुरू करण्यासाठी वा अभ्यासक्रम चालवण्यासाठी परवानगी नाही. असे असतानाही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे विद्यापीठात प्रवेश घेतल्याचे दाखवून बेकायदा केंद्र  चालवली जात असल्यासे समोर आले आहे. तशी योजना एका महाविद्यालयाने नुकतीच विद्यार्थ्यांपुढे मांडली आहे. कर्नाटक मुक्त विद्यापीठाचे महाराष्ट्रात चालणारे अभ्यासक्रम अवैध ठरविले आहेत.

प्रकरण काय?

पुण्यातील एका संस्थेने तंत्रशिक्षण विषयातील अभ्यासक्रमांसाठी कर्नाटक मुक्त विद्यापीठाची संलग्नता घेतली होती. मुळात राज्याबाहेर केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर या संस्थेने मुक्त विद्यापीठाशी करार केला. दरम्यान संस्था सुरू झाल्यापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची संलग्नताही काही तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना घेण्यात आली होती. कर्नाटक मुक्त विद्यापीठाकडून महाराष्ट्रात दिली जाणारी प्रमाणपत्रे अवैध ठरल्यानंतर या संस्थेच्या अनेक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी अडचणीत आले. त्यानंतर वेगवेगळ्या विद्यापीठांशी संपर्क साधून चुका झाकण्याचा प्रयत्न संस्थेकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी ज्या वर्षांचे शिक्षण घेतले आहे, त्या वर्षांची परीक्षा राजस्थानात जाऊन द्यायची अशी ही योजना आहे.