News Flash

“शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी…”, चंद्रकांत पाटलांचं अजितदादांना प्रत्युत्तर!

१४ महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते, असा टोला देखील लगावला आहे.

वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला म्हणून, आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची यादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून चोरून राज्यपालांना सादर केल्याचा मुद्दा उपस्थित केला. वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. ” असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (रविवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले.

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करण्याचा विषय १४ महिन्यांचा जुना आहे, आता का काढता असा सवाल अजित पवार यांनी केल्याबद्दल एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली. त्याविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती कारण त्यांना काही बोललो नव्हतो. परंतु त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बोलला तर मला बोलावे लागणार. कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवले आहे. १४ महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवार साहेबांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते, तरीही ते शहाणपणा शिकवतात.”

… त्यामुळे मला याचा राग येतो; अजित पवार भाजपावर भडकले

तसेच, “महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, हे अजित पवार यांचे विधान दांभिकपणाचे आहे. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात खटला नीट चालवला नाही म्हणून मराठा आरक्षण गमावले. या सरकारच्या चुका न्यायालयाच्या निकालपत्रात पानोपानी दिसतात. या निकालाच्या विरोधात एक महिन्यात फेरविचार याचिका दाखल करायला हवी होती पण सरकारने उशीर केला. त्यांनी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निकालाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. आम्ही महिनाभर जे मुद्दे मांडत होतो, तशाच शिफारशी या समितीने केल्या आहेत.”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनातही भाजपा सहभागी होणार –

“खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी १६ तारखेला कोल्हापुरात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांच्या घोषणेचे आपण स्वागत करतो. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देण्याची भाजपाची भूमिका आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनातही भाजपा सहभागी होईल.”, असे त्यांनी सांगितले.

सरकारने केवळ चार घटकांना तुटपुंजी मदत जाहीर केली –

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “करोनामुळे लॉकडाउन लागू करताना राज्य सरकारने लोकांना मदत करण्याची गरज आहे. पण सरकारने केवळ चार घटकांना तुटपुंजी मदत जाहीर केली आणि ती सुद्धा त्यांना मिळालेली नाही. भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, आपल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात चार हजार रिक्षाचालकांना प्रत्येकी एक हजार रुपयांची सीएनजी कुपन देण्यात येणार आहेत, जेणेकरून लॉकडाउन उठल्यानंतर पंधरा दिवस रिक्षाचालकांना इंधनाचा खर्च करावा लागणार नाही. मतदारसंघातील काही हजार मुलींना नवे ड्रेस शिऊन देण्यात येतील. तसेच १२०० जणांना करोनाची लस खासगी रुग्णालयात देण्यासाठी त्यांचे पैसे कार्यकर्त्यांमार्फत भरण्यात येतील.” अशी देखील माहिती यावेळी त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 8:02 pm

Web Title: list of 54 mlas stolen from sharad pawars drawer chandrakant patils reply to ajit pawar msr 87
Next Stories
1 पुणे : सोशल मीडियावरची मैत्री पडली महागात; नग्न व्हिडीओ बनवला अन् म्हणाला…
2 पुणे : करोनातून झाला बरा, पण पत्नीनेच गळा दाबून घेतला जीव; पोलिसांमुळे समोर आलं कारण
3 आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका; अजित पवारांचं पुणेकरांना आवाहन
Just Now!
X