पुणे : शहरात मंगळवारपासून पुन्हा टाळेबंदी लागू होत असल्यामुळे रविवारी खरेदीसाठी झुंबड उडाली. जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठांमध्ये अभूतपूर्व गर्दी उसळल्याने अंतर नियम मोडला गेला. भाजीपाल्यासह अनेक वस्तूंची मागणी वाढल्याने त्यांच्या दरात मोठय़ा प्रमाणावर वाढ करून विक्रेत्यांनी सामान्यांची लूट केली. तीन टक्के प्रतिबंधित क्षेत्रासाठी संपूर्ण शहराला वेठीस धरण्यास कडाडून विरोध होत आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहरात मंगळवारपासून टाळेबंदी लागू होणार आहे. त्यामुळे रविवारी सर्वच प्रकारच्या बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली. त्यात पोलिसांनी रविवारपासूनच रस्ते बंद करण्यास आणि अडथळे उभारण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिकांनी बाजारपेठांकडे धाव घेतली. भाजी बाजार, किरणा

दुकाने, अन्य पावसाळी साहित्याच्या दुकानांपुढे गर्दी उसळली. पीठ गिरण्यांमध्येही गर्दी झाली. अनेक दुकानांपुढे लांबचलांब रांगा लागल्या. अंतर नियमाचे पालनही झाले नाही. नागरिकांनी अन्नधान्य, भाजीपाल्याची चढय़ा दराने खरेदी केली. भाजीपाल्याच्या दरात विक्रेत्यांनी अचानक ३० ते ४० टक्क्यांनी वाढ केली.

पुन्हा टाळेबंदी लागू करून जे परिणाम साधणे अपेक्षित होते त्यावर शहरात उसळलेल्या तीन दिवसांतील गर्दीने आधीच पाणी फिरवले असे म्हणण्यास पूर्ण जागा आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केली. मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू नागरिकांनी आत्मकेंद्रितपणे भाजीपाला आणि किराणा भरण्यासाठी के लेली गर्दी, धाब्यावर बसवलेले अंतर आणि शिस्त पाळण्याचे नियम हे संसर्ग अधिकाधिक फै लावण्यास कारणीभूत ठरणारे आहे. त्यामुळे टाळेबंदी काळात साखळी तुटण्याची जी अपेक्षा आपण ठेवली होती ती व्यर्थ ठरली आहे, अशी खंत डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केली.

आयुक्तांच्या बदलीला भाजप-काँग्रेसचा विरोध

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या बदलीला काँग्रेस आणि भाजपने विरोध दर्शविला आहे. गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा आहे. सरकारने त्यांना बळीचा बकरा बनवले. अधिकाऱ्यांची अचानक बदली करणे योग्य नाही. राजकारण न करण्याचा सल्ला देणारे सरकारच अधिकाऱ्यांच्या बदलीवरून राजकारण करत आहे, असा आरोप खासदार गिरीश बापट यांनी केला. तर गायकवाड यांची बदली कोणाच्या दबावाखाली झाली, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे. एका कर्तबगार आयुक्तांची बदली करण्याचे गलिच्छ राजकारण केले जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी केली.

टाळेबंदी हा उपाय नाही- डॉ. सुभाष साळुंखे

टाळेबंदी करणे हा उपाय नाही, असे राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी स्पष्ट केले. रुग्ण वाढणारच आहेत हे गृहीत धरून ज्या भागात रुग्ण वाढतील तो भाग बंद करणे आणि शहर पूर्ववत सुरू ठेवणे हा मार्ग स्वीकारणे योग्य ठरेल. करोना संकटाला तोंड देण्यासाठी तात्पुरते नव्हे, तर किमान जून २०२१ पर्यंतचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.