उन्हाचा चटका वाढला; तापमानवाढ आठवडाभर
पुणे : यंदा दीर्घकाळ कमी-अधिक प्रमाणातील थंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता पुणे शहर आणि परिसरामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. शहरातील कमाल आणि किमान दोन्ही तापमानात वाढ नोंदविली जात असल्याने आता थंडी गायब झाली असून, उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे पंखे आणि वातानुकूलित यंत्रणांसह शीतपेयांकडे पुन्हा एकदा लक्ष वळू लागले आहे. पुढील आठवडाभर शहरात तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यासह यंदा पुणे शहर आणि परिसरामध्येही थंडीचा कालावधी काहीसा लांबला. शहरातील किमान तापमानात नीचांकी घट झाली नसली, तरी नागरिकांना यंदा दीर्घकाळ थंडीचा अनुभव मिळाला. डिसेंबरच्या थंडीची कसर जानेवारी महिन्याने भरून काढली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात शहरात थंडीच्या लाटेची स्थिती होती. या काळात यंदाच्या हंगामातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यानंतर मात्र तापमानाच चढ-उतार कायम राहिले. निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण होताच थंडीत वाढ, तर ढगाळ स्थिती येताच तापमानात वाढ होत राहिली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ातही थंडी कमी-अधिक प्रमाणात कायम राहिली. त्यानंतर मात्र दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ सुरू झाली.
शहर आणि परिसरात ११ फेब्रुवारीपर्यंत दिवसाचे कमाल तापमान ३० अंशांच्या खाली होते. १२ फेब्रुवारीनंतर मात्र तापमानात सातत्याने वाढ नोंदविली गेली. दोन ते तीन दिवसांपासून त्यात झपाटय़ाने वाढ होत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले. त्यामुळे शहराला उन्हाळ्याची चाहूल लागली. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने पहाटेची थंडीही आता गायब झाली आहे. शहर आणि परिसरात सोमवारी (१७ फेब्रुवारी) ३३.७ अंश सेल्सिअस कमाल, तर १६.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
आठवडाभर ३४ अंशांच्या आसपास
शहर आणि परिसरात आणखी एक दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. २१ फेब्रुवारीपर्यंत आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ होणार आहे. त्यानंतर पुन्हा आकाश निरभ्र होणार आहे. या स्थितीमध्ये संपूर्ण आठवडाभर शहरातील दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्या किमान तापमानात वाढ होऊन ते १८ अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
शहरातील तापमान वाढ (अंश सेल्सिअस)
दिनांक कमाल किमान
१० फेब्रुवारी २९.१ १६.९
१२ फेब्रुवारी ३०.३ १७.२
१४ फेब्रुवारी ३१.९ १५.०
१६ फेब्रुवारी ३३.६ १५.७
१७ फेब्रुवारी ३३.७ १६.१