पुणे शहरात पीएमपीएंमएलकडून लवकरच ‘मी कार्ड’ची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत एचआयव्ही बाधितांना मोफत बस सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी दिली. या कार्डची नोंदणी करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. एचआयव्ही बाधितांना आरोग्य विभागाकडून मिळालेला रिपोर्ट दाखवून या सेवेचा लाभ घेता येईल. वैद्यकीय रिपोर्ट दाखवल्यानंतर तात्काळ त्यांना पास दिला जाईल, असे मुंढेनी सांगितले. बुधवारी पीएमपीएमएल संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंढे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पीएमपीएमएलच्या मासिक पास सुविधेमध्ये बदल केल्याची माहिती देखील देण्यात आली. ते म्हणाले की, आता पीएमपीएमएलकडून सरसकट पासधारकांना १४०० रूपये दराचा पास दिला जाणार आहे. यापूर्वी पुण्याच्या हद्दीतील पाससाठी १२०० रुपये आणि हद्दीबाहेरील पाससाठी १५०० रुपये आकारण्यात येत होते. मासिक पास सुविधेतील बदलासोबत आठवड्याला मिळणारी पास सुविधा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विना तिकीट प्रवास करणाऱ्या तसेच पासचा दुरुपयोग करणाऱ्या प्रवाशांवर लगाम घालण्यासाठी दंडात्मक रकमेत देखील वाढ करण्यात आली. विना तिकीट प्रवाशांकडून पूर्वी १०० रूपये दंड आकारला जायचा. आता त्यांच्याकडून  ३०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. येत्या दीड वर्षांत ८०० नवीन बसेस खरेदी करण्यात येणार असून बीआरटी आणि अन्य मार्गांवर या बसेस चालवल्या जातील. यामध्ये निम्म्या बसेस या सीएनजीवर चालणाऱ्या तर निम्म्या बसेस या डिझेलवर चालणाऱ्या असतील, असेही मुंढे यांनी सांगितले.