लोहमार्गाखालून पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था

मावळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे मागील वर्षी पुणे- लोणावळा दरम्यान कामशेत रेल्वे स्थानकाजवळ लोहमार्गाखालील भरावच वाहून गेल्याने पुणे- मुंबई रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा प्रकार झाला होता. या प्रकाराची तातडीने दखल घेत मागील वर्षभरात लोहमार्गाखालून पाणी वाहून जाण्यासाठी विविध मार्ग तयार करण्यात आल्याने यंदा चांगला पाऊस पडूनही अद्याप तरी रेल्वे प्रवाशांचा खोळंबा टळला आहे. दरवर्षी लोहमार्गावर पाणी येण्याचे प्रकार होत असताना यंदा हा प्रकारही घडला नसल्याने प्रवाशांमध्ये काहीसे समाधान आहे.

मावळ भागामध्ये दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडत असतो. यंदाही जुलैमध्ये या भागात चांगला पाऊस झाला. पूर्वी किमान पाऊस झाला, तरी कामशेत परिसरामध्ये लोहमार्गावर पाणी येऊन रेल्वे वाहतूक थांबवावी लागत होती. काही वेळेला वाहतूक धिमी होत होती. त्याचा परिणाम म्हणून पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाडय़ा, लांब पल्ल्याच्या गाडय़ा व पुणे- लोणावळा लोकलची वाहतूक विस्कळीत होत होती. मात्र, यंदा प्रथमच पावसाळ्यामध्ये अद्याप तरी रेल्वेची वाहतूक पावसामुळे विस्कळीत झालेली नाही. हा चांगला परिणाम असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रेल्वे प्रशासनाने मागील सात ते आठ महिन्यांमध्ये पुणे- लोणावळा मार्गावर अनेकदा वाहतूक काही वेळ बंद ठेवली. काही लोकल गाडय़ा त्याचप्रमाणे पॅसेंजर गाडय़ा रद्द करून कामशेत भागामध्ये लोहमार्गाखालून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली. या भागामध्ये मुसळधार पावसामुळे टेकडय़ांवरून मोठय़ा प्रमाणावर पाणी लोहमार्गाकडे येते. पूरस्थिती निर्माण झाल्यास हे पाणी लोहमार्गाचा भराव फोडून पुढे जाते. ही स्थिती मागील वर्षी अनुभवली आहे. त्यामुळेच टेकडय़ांवरून येणारे पाण्याचे प्रवाह सुरळीतपणे लोहमार्गाखालून जावेत, अशी व्यवस्था यंदा उभारण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप तरी रेल्वे वाहगतूक सुरळीत आहे, मात्र भविष्यातही वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कायमस्वरूपी उपाययोजनेची आवश्यकता

कामशेत परिसरामध्ये रेल्वे प्रशासनाने केलेल्या कामाचा सध्या तरी चांगला परिणाम दिसत असला, तरी मोठी पूरस्थिती लक्षात घेता ही कामे उपयुक्त आहेत का, याचा आढावा घेणे गरजेचे असून, या भागामध्ये कायमस्वरूपी उपाययोजनांची आवश्यकता असल्याची मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी केली आहे. कामशेत भागामध्ये रेल्वेसाठी पक्के पूल उभारण्याची गरज आहे. हे काम झाले, तरच रेल्वे प्रवाशांचा खोळंबा कायमचा दूर होऊ शकेल, असेही शहा यांनी सांगितले.