पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे यांचे जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावले.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून डॉ. तावडे यांनी यापूर्वी तीन वेळा जामीन अर्ज सादर केला होता, तसेच भावे यांनी दुसऱ्यांदा जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी जामीन मिळवण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज सादर केला होता, अशी माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी दिली. दरम्यान, डॉ. तावडे यांनी वृद्ध वडिलांना भेटण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने पोलिसांच्या बंदोबस्तात डॉ. तावडे यांना वडिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

डॉ. तावडे सनातन संस्थेचे पूर्णवेळ साधक आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कोल्हापुरातील ज्येष्ठ कामगार नेते गोिवद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात डॉ. तावडे मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका सीबीआयकडून ठेवण्यात आला होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याला त्याचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी पिस्तूल खाडी पुलावरून फेकून देण्याचा सल्ला दिला होता. कळसकर आणि त्याचा साथीदार सचिन अंदुरे यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती, असे सीबीआयने दोषारोपपत्रात म्हटले आहे. कळसकर याला बंगळुरूतील पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात मे २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. कळसकर याने सीबीआयला दिलेल्या कबुली जबाबावरून अ‍ॅड. पुनाळेकर, भावे यांना अटक करण्यात आली होती.