िपपरीचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची स्पष्टोक्ती

िपपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध गृहप्रकल्पांचे पूर्वानुभव पाहता यापुढील काळात सर्व गोष्टींची पूर्तता झाल्याखेरीज बांधकामांना सुरूवात होणार नाही. जागा ताब्यात आहे का, सर्व आवश्यक परवानगी मिळाली आहे का, याची खात्री केली जाईल. विनाकारण पालिकेचा पैसा वाया जाऊ देणार नाही, असे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आयुक्त वाघमारे म्हणाले,की महापालिकेच्या वतीने केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. या योजनेनुसार ज्या व्यक्तीचे उत्पन्न वार्षिक तीन लाख रूपये आहे, तोच लाभार्थी ठरणार आहे. ३० चौ. मी. चटई क्षेत्रापर्यंतच्या प्रत्येक घरासाठी दीड लाख केंद्राचे व एक लाख राज्याचे अनुदान असून उर्वरित हिस्सा महापालिका व लाभार्थीचा राहणार आहे. सर्व प्रक्रिया पार पाडल्याशिवाय नव्या गृहप्रकल्पांना सुरूवात होणार नाही. बालेवाडी येथील दुर्घटनेनंतर शहरात मंजूर क्षेत्रापेक्षा वाढीव बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बालेवाडीत ज्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना दुर्घटना झाली, त्यांच्याच चार गृहप्रकल्पांचे काम शहरात सुरू आहे. त्याची पाहणी करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. तेथे नियमबाह्य़ काम आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. अशाप्रकारे वाढीव बांधकाम केल्याची शंका असणाऱ्या १० अन्य बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांची कागदपत्रे तपासून घेतली जाणार आहेत. चिखलीतील घरकुल प्रकल्पातील काही इमारती अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात, राज्यशासनाने आदेश दिल्यास त्या इमारती पाडण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

आयुक्त म्हणाले

  • पाणीकपात रद्दचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर
  • श्वान तसेच पक्षी उद्यान होणार
  • आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन पूर्ण
  • आकुर्डी-प्राधिकरण रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभीकरण करणार.
  • नियमबाह्य़ काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई
  • निगडीतील भक्ती शक्ती चौक ‘सिग्नल फ्री’ करणार

‘१४१९ खड्डे बुजवले’

खड्डय़ांची माहिती व्हॉट्स अ‍ॅपवर (७७४५०६१९९९) पाठवण्याचे आवाहन महापालिकेने केले, त्यास शहरवासीयांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरात १६९२ खड्डे आढळून आले. त्यापैकी १४१९ खड्डे बुजवण्यात आले. उर्वरित खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या वेळी दिली.

खड्डय़ांची माहिती व्हॉट्स अ‍ॅपवर (७७४५०६१९९९) पाठवण्याचे आवाहन महापालिकेने केले, त्यास शहरवासीयांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरात १६९२ खड्डे आढळून आले. त्यापैकी १४१९ खड्डे बुजवण्यात आले. उर्वरित खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या वेळी दिली.