माहिती देण्यास पालिकेकडून टाळाटाळ

शहरासाठी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी महापालिका दरवर्षी धरणांमधून उचलते. याबाबत जलसंपदा विभाग आणि महापालिकेमध्ये वाद आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याचे तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला शहराच्या पाणीवापराचे लेखापरीक्षण करण्याची सूचना गेल्या जून महिन्यात केली होती. मात्र, महापालिकेकडून दीड वर्षांनंतरही पाणीवापराचे लेखापरीक्षण करण्यात आलेले नाही. याबाबत जलसंपदा विभागाला माहिती देण्यात टाळाटाळ केली जात आहे.

शहरासाठी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी पुणे महापालिकेकडून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून उचलण्यात येते. हे अतिरिक्त पाणी नेमके जाते कोठे? त्या पाण्याचे काय होते, कोणी चोरी करते किंवा कसे? याबाबतची माहिती घेण्याचे काम महापालिकेचे आहे. यासाठी पालिकेने शहराच्या पाणीवापराचे लेखापरीक्षण करावे, अशी सूचना महाजन यांनी गेल्या वर्षी ५ मे रोजी पर्वती जलकेंद्र येथे साकारलेल्या जलशुद्धीकरण  प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली होती. त्यानंतर पाणीवापराच्या वादाबाबत महाराष्ट्र      दीड वर्षांनंतरही महापालिकेकडून पाणीवापराचे लेखापरीक्षण नाहीच

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानेही (महाराष्ट्र वॉटर र्सिोसेस रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी – एमडब्लूआरआरए) पाण्याचे लेखापरीक्षण करण्याची सूचना केली होती.

महापालिकेकडून अतिरिक्त पाणी वापरण्यात येत असल्याने शेती आणि सिंचनासाठी पाणी कमी पडत असल्याचा आरोप जिल्ह्य़ाच्या इतर भागातून दरवर्षी करण्यात येतो. पाणी नियोजनाचे काम जलसंपदा विभागाकडे आहे. खडकवासला धरणातून शहरासाठी ८.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याचा मापदंड ठरवून दिला आहे. तर, राज्य सरकारने त्यामध्ये वाढ करत महापालिकेला प्रतिवर्षी साडेअकरा टीएमसी कोटा दिला आहे.

प्रत्यक्षात महापालिकेकडून वर्षांला साडेसतरा टीएमसी पाणी उचलले जाते. एका व्यक्तीसाठी १५५ लिटर पाणी आवश्यक असताना ३३५ लिटर पाणी उचलले जाते. ही परिस्थिती पाहता अतिरिक्त पाण्याचा शोध घेणे गरजेचे आहे.

लेखापरीक्षण कशासाठी?

पाणी लेखापरीक्षणामध्ये किती पाण्याचा अपव्यय झाला आणि त्यातून किती नुकसान झाले, याचा आढावा घेण्यात येतो. येणाऱ्या आणि जाणाऱ्या पाण्याचा हिशोब ठेवणे, वापर आणि पुरवठा यामधील तफावत, महसूल निर्माण करून न देणारे पाणी कमी करणे आणि त्यातून पाणी बचत, गळती व बेकायदा पाणीवापर आदी माहिती औरंगाबाद येथील राज्याचे मुख्य लेखा परीक्षक जल व सिंचन मुख्यालयाला देणे अपेक्षित आहे.

पुणे महापालिकेने पाणीवापराचे लेखापरीक्षण केले किंवा कसे, याबाबत माहिती नाही. लेखापरीक्षणाची माहिती अद्याप महापालिकेने जलसंपदा विभागाला कळवलेली नाही. महापालिकेने लेखापरीक्षण केले असते, तर त्याबाबतची माहिती आम्हाला नक्कीच कळवली असती. – विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग