27 February 2021

News Flash

पोलिसांकडून करण्यात येणारी चारित्र्य पडताळणी ‘पेपरलेस’

ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

चारित्र्यपडताळणी अर्ज स्वीकृती बंद; ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या चारित्र्य पडताळणीसाठी स्वीकारण्यात येणारी अर्जपद्धती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.चारित्र्य पडताळणीसंदर्भात दाखल होणारे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. चारित्र्य पडताळणी ऑनलाइन झाल्यामुळे या पुढील काळात अर्जदारांना पोलीस आयुक्तालयात हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही.

बहुराष्ट्रीय कंपनी, माहिती-तंत्रज्ञान कंपनी, सरकारी तसेच खासगी कार्यालयापासून अगदी रखवालदार, हॉटेलमधील कर्मचारी, मजुरांनी नोकरीसाठी अर्ज दिल्यानंतर त्याला चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक आहे. चारित्र्य पडताळणीसंदर्भात पोलिसांकडून दिलेला अहवाल किंवा शिफारसपत्र जोडल्यानंतर पुढील कार्यवाही पार पडते. पुणे पोलीस आयुक्तालयात चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चारित्र्य पडताळणी ऑनलाइन करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार एक सप्टेंबरपासून चारित्र्य पडताळणीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, चारित्र्य पडताळणीसाठी येणारे अर्ज देखील स्वीकारण्यात येत होते. गेल्या पंधरवडय़ापासून चारित्र्य पडताळणीसाठी स्वीकारण्यात येणारी अर्जस्वीकृती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यापुढील काळात चारित्र्य पडताळणी ऑनलाइन करण्यात येणार आहे. चारित्र्य पडताळणीचा अर्ज सादर करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात येण्याची गरज राहणार नाही. या निर्णयाचा सामान्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेतील सूत्रांनी दिली. चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय पुढील प्रक्रिया पार पडत नाही. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये पुणे परिसरात आहेत. खासगी व्यवसायात देखील चारित्र्य पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यापासून अगदी शिपायाला देखील एखाद्या संस्थेत नोकरी मिळवायची असेल, तर त्याला चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा लागतो, असे विशेष शाखेतील एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

ऑनलाइन चारित्र्य पडताळणी सुविधा https://pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्यांमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून रिक्षाचालक, परप्रांतीय मजूर आदींचा समावेश आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून परमीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर चारित्र्य पडताळणी करून घेण्यासाठी रिक्षाचालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. विशेष शाखेकडून जवळपास पंचवीस ते तीस हजार रिक्षाचालकांची पडताळणी करून त्यांना अहवाल देण्यात आला होता. चारित्र्य पडताळणीचा अहवाल तीस दिवसांत देणे बंधनकारक आहे. मात्र, विशेष शाखेतील अधिकारी, कर्मचारी चारित्र्य पडताळणीसंदर्भात आलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करून पंधरा ते वीस दिवसांत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतात. ऑनलाइन चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.

अर्जदारांना दिलासा

चारित्र्य पडताळणीसाठी यापूर्वी अर्ज स्वीकारण्यात येत होते. चारित्र्य पडताळणी ऑनलाइन झाल्यामुळे अर्जदारांना पोलीस आयुक्तालयात हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही. निगडी, पिंपरी, हिंजवडी, दिघी भागातून पडताळणीसाठी येणाऱ्या नागरिकांना चरित्र्य पडताळणीसाठी यापूर्वी पोलीस आयुक्तालयात यावे लागत होते. या निर्णयामुळे पडताळणी करून घेणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 3:09 am

Web Title: paperless character verification by maharashtra police
Next Stories
1 चित्रपटसृष्टीतील अजरामर जोडय़ांना दिनदर्शिकेत स्थान 
2 शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
3 शहर स्वच्छतेचा डंका; पवनाथडीचे ‘जत्रा’कारण
Just Now!
X