पार्थ पवार हे माझे मित्र असून पवार कुटुंब हे आदर्शवत कुटुंब आहे. त्यांच्यातील सध्याचा विषय हा तात्पुरता विषय आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. पार्थ पवार हे वारंवार पक्षविरोधी भूमिका मांडत आहेत. यावर टोपे यांना पुण्यात पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली. पार्थ यांनी आजवर मांडलेल्या भूमिकेबाबत आपलं त्यांच्याशी बोलणं झाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “आपला देश कायद्यावर चालतो. त्यामुळे आम्हाला कोर्टाच्या निर्णयाचा आदर असून महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी चांगले काम केले आहे. आता हे प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे सरकार याबाबत सर्व सहकार्य करणार आहे.”

वाढीव बील आल्यास रुग्णालयांवर कारवाई करा : राजेश टोपे

पुणे शहरात मागील काही दिवसात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण आता ही वाढ खाली येईल असं आम्हाला खात्रीपूर्वक वाटत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड पण वाढवत आहोत. जे खाजगी हॉस्पिटलमध्ये अधिक बील आकारात आहेत, अशांवर सरकारचे लक्ष असून त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांमार्फत हॉस्पिटलमध्ये ८० टक्के बेड मिळावे यासाठी ऑडिटेर नेमले आहेत. अधिकचे बील आकारणार्‍या रुग्णालयावर आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. एखाद्या रुग्णालयाने १०० रुपये जास्त घेतले, तर त्यांच्याकडून ५०० रुपये वसूल करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

“पुणेकरांनी नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा”

पुणे शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो. येथील उत्सव मी महाविद्यालय जीवनात अनुभवाला आहे. त्यामुळे मी येथील सर्व नागरिकांची भावना समजू शकतो. पण यंदा करोनाच्या संकटामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमाचे पालन करून हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे त्यांनी केले.