शहरातील विविध भागात पाणीटंचाईच्या तक्रारी असून त्याकडे प्राधान्याने लक्ष द्या, असे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी दिले आहेत. उद्यानांसाठी पिण्याचे पाणी वापरू नका, असेही आयुक्तांनी बजावले आहे.
पिंपरी महापालिकेच्या सहाही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील समस्या संबंधित नगरसेवकांकडून जाणून घेतल्यानंतर त्या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. आयुक्त म्हणाले, पाणीपुरवठय़ासाठी तीन अभियंते आहेत. ते वैयक्तिक स्वरूपात पाण्याच्या समस्येकडे लक्ष देत आहेत. दापोडीत पाण्याची टंचाई दूर करण्यात आली आहे. भोसरीसह अन्य भागातील पाण्याच्या तक्रारींकडे लक्ष दिले जात आहे. असमान पाणीवाटप होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. काळेवाडीत पादचाऱ्यांसाठी पूल उभारण्यात येईल. वाकड कस्पटे वस्तीतील रस्त्यासाठी तरतूद करण्यात येईल. मैलाशुध्दीकरणाची जागा ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही सुरू होईल. पिंपळे सौदागर येथील पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात येईल. पिंपरी ते पिंपळे सौदागर मार्गावर पवना नदीवरील पुलाचे रुंदीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्य शासनाने मोबाईल टॉवर्सच्या बाबतीत आवश्यक ती परवानगी देण्याचे धोरण आखले आहे. पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याने याबाबतचे धोरण लवकरच ठरवण्यात येणार आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहे. भोसरी उड्डाणपुलाखालील हातगाडय़ा हटवण्यात याव्यात, असे आदेशही आयुक्तांनी दिले.
 
‘गॅमन’ कंपनीला निर्वाणीचा इशारा
चिंचवड स्टेशन येथील इम्पायर इस्टेटच्या उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ‘गॅमन’ कंपनीला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण करावे, अन्यथा गय केली जाणार नाही, कंपनीला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आयुक्त राजीव जाधव यांनी स्पष्ट केले आहे.