रब्बी आवर्तनापूर्वी कामे पूर्ण करण्याचे नियोजन

लांबलेला पाऊस ओसरल्याने आणि खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने मुठा उजवा कालव्यातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी अर्धवट राहिलेल्या कालव्याच्या उर्वरित कामांना जलसंपदा विभागाकडून प्रारंभ करण्यात आला आहे. रब्बी आवर्तन सुरू करण्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुठा उजवा कालवा फुटण्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाकडून कालवा दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली होती. कालव्याची दुरुस्ती, गाळ काढणे आणि गळती रोखण्याची कामे प्राधान्याने करण्यात आली. मात्र, यंदाचा पावसाळा सुरू होण्याआधी त्यातील काहीच कामे पूर्ण होऊ शकली.

जुलैच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कालव्याला मोठी गळती नव्हती, तसेच जलसंपदा विभागाकडून खबरदारीची कामे करण्यात आली होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत मुठा उजवा कालव्यातून सातत्याने पाणी सोडण्यात येत होते. गेल्या दोन आठवडय़ांपासून धरणांच्या परिसरात पाऊस थांबल्याने जलसंपदा विभागाने कालवा दुरुस्तीचे उर्वरित काम हाती घेतले आहे. धरणापासून ३० कि.मी अंतरावरील विविध १५ ठिकाणी ही दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, कालवा कशामुळे फुटला, शहरातून वाहणारा कालवा किती ठिकाणी धोकादायक आहे, याबाबतचा अहवाल देण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. या समितीने कालव्याची पाहणी करून राज्य सरकारला अहवाल दिला. समितीने केलेल्या शिफारशीनुसार कालव्याची कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

कालव्याचे मजबुतीकरण

गेल्या दहा दिवसांपासून कालव्याची दुरुस्ती सुरू आहे. कालव्याचे मजबुतीकरण, भराव टाकणे, राडारोडा काढणे, झाडेझुडपे काढून टाकणे, कालव्याचा प्रवाह सुरळीत करणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत.