निधी वळवण्यासाठी पालिका अधिकारीही सरसावले!
पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेल्या कामांचा निधी त्याच कामांसाठी वापरला जावा, यासाठी आर्थिक शिस्तीची अपेक्षा व्यक्त होत असतानाच अंदाजपत्रकातील निधीची पळवापळवी करण्यासाठी नगरसेवकांबरोबरच अधिकारीही सरसावले आहेत. गेल्या पाच महिन्यांत पालिकेच्या विविध विभागांनी अंदाजपत्रकातील शंभर कोटी रुपयांहून अधिक रक्कम अन्य कामांसाठी वळविली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा थेट परिणाम अंदाजपत्रकावर होण्याची शक्यता आहे.
उत्पन्न कमी मिळत असतानाही खर्च करण्यात हात आखडता न घेतल्यामुळे आर्थिक वर्षांच्या शेवटच्या टप्प्यात निधीसाठी धावाधाव करण्याची वेळ अलीकडच्या काही वर्षांत महापालिका प्रशासनावर आली आहे. या वेळी मात्र पहिल्या सहा महिन्यांतच अधिकाऱ्यांनी विविध कामासाठीचा राखीव निधी दुसऱ्या कामांना वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाबाबतचा अधिकाऱ्यांचा अंदाज फसल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आर्थिक शिस्त लागावी या हेतूने काही उपाययोजना केल्या होत्या. त्यात अंदाजपत्रकातील कामांचा निधी त्याच कामांसाठी वापरण्यात यावा, अन्य कामांसाठी तो वापरण्याची परवानगी मागण्यात येऊ नये, कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशा काही बाबींचा त्या उपाययोजनांमध्ये समावेश होता. मात्र आयुक्तांचे आदेश धुडकावून स्थायी समितीपुढे सर्रास निधी वर्गीकरणाचे प्रस्ताव दाखल होत असून स्थायी समितीनेही प्रस्तावांना मान्यता दिली.
पाणीपुरवठा, आरोग्य, घनकचरा, विद्युत विभाग, पथ, समाजकल्याण विभागाकडून त्यांना काही कामांसाठी निधीची चणचण भासत असल्याचे सांगत अन्य कामांसाठीचा राखीव निधी देण्याचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आले आहेत. पाणीपुरवठा विभागाने पंचवीस कोटी, घनकचरा व्यवस्थापन विभागाने २७ कोटी, विद्युत विभागाने १० कोटी, आरोग्य विभागाने २० कोटी, सांडपाण्यासाठी ५ कोटी, मालमत्ता व्यवस्थान विभागासाठी ३ कोटी रुपये अन्य कामातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय शहरी गरीब योजनेसाठी कोटय़वधी रुपयेही याच प्रकारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, समाज विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठीही पंधरा कोटी, भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासाठी २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
अंदाज चुकला
उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात जुन्या योजनांवरच भर देण्यात आला आहे. तसेच विविध विभागांना देण्यात येणाऱ्या निधीमध्येही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे निधीची चणचण भासत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात वर्षभरात होणारे प्रकल्प, खात्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी होणारा खर्च, नव्या प्रकल्पांच्या उभारणीसाठीचा खर्च आणि जुन्या योजनांसाठी अपेक्षित तरतूद यांचा विचार करून त्या-त्या खात्याला स्वतंत्र तरतूद उपलब्ध करून दिली जाते. मात्र अधिकाऱ्यांचा अंदाज चुकत असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
विसंगत कृती
महापालिका अंदाजपत्रकातील प्रकल्पांसाठीची आर्थिक तरतूद नगरसेवकांकडून प्रभागातील किरकोळ कामांसाठी वळविण्यात येत असल्यामुळे असे ठराव मान्य करण्यात येऊ नयेत, असा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावाला बरोबर विसंगत कृती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच सुरू झाली आहे.