पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होणारी चौतीस गावे आणि हद्दवाढ लक्षात घेऊन महापालिका भवनाच्या आवारात आणखी एक चार मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या नव्या इमारतीची २४ कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य सभेसाठीचे सभागृह या इमारतीत असेल.
महापालिका भवनाच्या इमारतीचा विस्तार करण्याचा प्रस्ताव गेली काही वर्षे चर्चेत होता. हा प्रस्ताव आता मूर्त रूप घेणार असून तीन वर्षांत नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल. स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी नव्या इमारतीसंबंधी घेण्यात आलेल्या निर्णयाची ही माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. नवीन इमारत सध्याच्याच इमारतीशी सुसंगत, एकसंध दिसेल आणि दोन्ही इमारतींमध्ये सारखेपणा असेल अशा स्वरूपाचे बांधकाम करण्यात येणार आहे. सध्याची इमारत घडीव दगडातील असून नव्या इमारतीची रचनाही तशीच असेल.
महापौर कार्यालयासह अन्य सर्व राजकीय पक्षांची व पदाधिकाऱ्यांची कार्यालये नव्या इमारतीत बांधली जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांचा समावेश असेल. मुख्य सभेसाठीचे सभागृह आणि स्थायी समितीच्या बैठकीसाठीचे सभागृह देखील या नव्या इमारतीत असेल. मुख्य सभेसाठी आठ हजार चौरसफुटांचे सभागृह बांधण्याचे नियोजन असून या सभागृहात २२५ सदस्यांची आसनव्यवस्था करण्याचे नियोजन आहे. स्थायी समितीचे तसेच नगरसचिव विभागाचे कार्यालयही या इमारतीत असेल. संपूर्ण इमारतीच्या बांधकामासाठी २४ कोटी २६ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
महापालिका हद्दीत नव्याने चौतीस गावे समाविष्ट होणार असल्यामुळे सदस्यांची, पदाधिकाऱ्यांची संख्या वाढणार असून कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढणार आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय कामकाजासाठी आणखी जागा लागणार असल्यामुळे नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.