News Flash

थांबा, गतिरोधकांचे सर्वेक्षण सुरू आहे!

शहरात ठिकठिकाणी बसवण्यात आलेले रबरी गतिरोधकामुळे वाहनचालकांना पाठीच्या मणक्याचा त्रास होत असल्याची टीका काही महिन्यांपासून होत आहे.

| August 28, 2015 01:30 am

शहरात ठिकठिकाणी बसवण्यात आलेले रबरी गतिरोधकामुळे वाहनचालकांना पाठीच्या मणक्याचा त्रास होत असल्याची टीका काही महिन्यांपासून होत आहे. असे अनेक गतिरोधक उखडले आहेत, त्यांची वाईट अवस्था झाली आहे. मात्र, याबाबत महापालिकेकडे काहीही ठाम माहिती नाही. या संबंधी माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ‘याबाबत सर्वेक्षण आणि माहिती घेण्याचे काम सुरू आहे’ असे उत्तर देण्यात आले.
शहरात ठिकठिकाणी रबरी गतिरोधक बसवण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर परवानगी न घेता हे काम झाले आहे. या गतिरोधकांमुळे पाठीच्या मणक्याला धक्का बसत असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत बरीच टीकासुद्धा झाली आहे. हे गतिरोधक काढून टाकावेत या मागणीसाठी महापालिकेसमोर आंदोलनही झाले आहे. हे गतिरोधक तुकडय़ांमध्ये असतात. ते खिळ्यांनी रस्त्यात ठेकले जातात. अनेक ठिकाणी त्यांचे काही तुकडे निघाले आहेत आणि त्यासाठी ठोकलेले खिळे रस्त्यात राहिले आहेत. त्यामुळे ते वाहनचालकांसाठी धोकादायक बनले आहेत. अशा गतिरोधकांची पुण्यातील स्थिती काय याबाबत ठाम माहितीच महापालिकेकडे नसल्याचे अलीकडे स्पष्ट झाले आहे.
या प्रश्नाचा मराठा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंदे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांनी माहितीच्या अधिकारात महापालिकेला काही माहिती विचारली होती. हे गतिरोधक शास्त्रीयदृष्टय़ा योग्य आहेत का, ते कोणकोणत्या परिसरात बसवण्यात आले आहेत, ते बसवताना कोणत्या तज्ज्ञांची सल्ला घेण्यात आला होता आणि त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली होती का, असे प्रश्न त्यांनी विचारले होते. त्यावर शिंदे यांना एका महिन्यानंतर माहिती मिळाली. त्यात म्हटले आहे, की पुणे महापालिका पथ विभागातर्फे शहरातील गतिरोधकांचे सर्वेक्षण व माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर याबाबत माहिती देता येईल.
या उत्तरावरून असे स्पष्ट झाले आहे, की हे गतिरोधक बसवण्यापूर्वी महापालिकेकडे त्यांच्याबाबत तांत्रिक माहिती उपलब्ध नाही. अशी माहिती नसताना हे गतिरोधक बसवणे धोकादायक आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबतही तांत्रिक माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी किंवा हे गतिरोधक काढून टाकावेत, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.
रबरी गतिरोधकांबाबात कोणते प्रश्न
– त्यांच्यामुळे पाठीला त्रास होतो.
– ते तुकडय़ांमध्ये असतात, त्यांची उंची कमी जास्त असते.
– काही दिवसांनी त्यांच्यावरून वाहने घसरतात.
– तुकडे निघून जाऊन रस्त्यात खिळे राहतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2015 1:30 am

Web Title: pmc speed breakers survey
टॅग : Pmc,Survey
Next Stories
1 महाराष्ट्रीय भोजन प्रसिद्धीअभावी जगभरात पोहोचू शकले नाही – अॅडगुरू प्रल्हाद कक्कर
2 ‘स्मार्ट सिटी’ला पिंपरीतून वगळणे ही राज्यसरकारची चूकच – शिवसेनेच्या खासदारांचा ‘घरचा आहेर’
3 संयुक्तपणे लेखन केलेल्या इंग्रजी प्रेमकथेचे प्रकाशन
Just Now!
X