महावितरणचा एसएमएस आल्यापासून पाच दिवसांची मुदत

पुणे : करोनाच्या काळात मीटर रीडिंग होऊ न शकलेल्या भागांतील ग्राहकांना स्वत:च मोबाइल अ‍ॅप किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून रीडिंग पाठविण्याचे आवाहन करण्यात येत होते.  ही सुविधा आता सर्वच लघुदाब वीजग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, रीडिंग पाठविण्याबाबत महावितरणकडून ग्राहकाच्या मोबाइलवर संदेशही पाठविण्यात येत आहे. संदेश मिळाल्यानंतर पूर्वी २४ तासांत रीडिंग पाठविणे आवश्यक होते. ही मुदत आता पाच दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी याबाबतची माहिती दिली. सध्या केंद्रीकृत वीजदेयक प्रणाली राबविण्यात येत असल्याने प्रत्येक महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत एका निश्चित दिवशी लघुदाब वीजग्राहकांच्या मीटरचे फोटो रीडिंग घेतले जाते. त्याआधी एक दिवस महावितरणकडून ग्राहकांना स्वत:च मीटर रीडिंग पाठविण्याच्या आवाहनाचे संदेश पाठविले जात आहेत. हा संदेश मिळाल्यापासून पाच दिवसांपर्यंत ग्राहकाला मोबाइल अ‍ॅप किंवा महावितरणच्या संकेतस्थळाद्वारे रीडिंग पाठविता येणार आहे. यापूर्वी केवळ रीडिंग होऊ शकत नसलेल्या भागांतील ग्राहकांनाच याबाबतचे संदेश पाठविले जात होते.

रीडिंग पाठविण्यासाठी महावितरण मोबाइल अ‍ॅप आणि महावितरणकडे मोबाइल क्रमांक ग्राहक क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. मीटरमध्ये रीडिंगची संख्या दिसल्यानंतरच अ‍ॅपमध्ये फोटो काढावा. फोटोनुसार अ‍ॅपमध्ये रीडिंगची नोंद करावी. http://www.mahadiscom.in  या संकेतस्थळावर फोटो, ग्राहक क्रमांकासह नोंदणी करावी.

स्वत: रीडिंग पाठविण्याचे फायदे

’ मीटर आणि रीडिंगकडे नियमित लक्ष

’ वीजवापरावर नियंत्रण

’ रीडिंगनुसार देयक आल्याची खात्री

’ मीटर सदोष असल्यास तत्काळ तक्रार

– रीडिंग अचानक वाढल्याच्या कारणांचा शोध