भरती प्रक्रियेत यापुढे तंदुरुस्तीला दुय्यम स्थान

पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी स्पर्धाचे गुण कमी करून प्रथम लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पोलीस दलाची ‘स्मार्ट’ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे या पुढील काळात पोलीस दलात हुशार उमेदवारांचा समावेश करण्यासाठी लेखी परीक्षेला प्राधान्य देण्यात आले असून राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार भरती प्रक्रियेत प्रथम १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी स्पर्धेत सहभागी होता येईल.

पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्या बाबतचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाकडून नुकतेच देण्यात आले आहेत. दरम्यान, या बदलांना पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी विरोध केला आहे. उमेदवारांनी मध्यंतरी मंत्रालयापर्यंत धावत जाऊन राज्य शासनाचा निषेध करण्याचा प्रयत्न केला होता.

पोलीस दलातील भरती टप्प्याटप्प्याने होते. अन्य शासकीय कार्यालयांच्या तुलनेत पोलीस दलातील भरतीची प्रक्रिया नियमित सुरू राहते. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांचे पोलीस शिपाई भरती प्रक्रि येत सहभागी होण्याचे प्रमाण मोठे आहे. पोलीस दलातील कामाचा व्याप पाहता शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे, मात्र शासनाने भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीला दुय्यम स्थान दिल्याने भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.

नव्या प्रक्रियेबाबत पुणे पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) साहेबराव पाटील म्हणाले, पोलीस दलाच्या कामकाज पद्धतीत बदल होत आहे. पोलिसांचे काम आता पूर्वीप्रमाणे होत नाही. पोलीस तंत्रकुशल असणे तसेच त्यांना सामाजिक, राजकीय ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रि येत राज्य शासनाकडून बदल करण्यात आले आहेत. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी स्पर्धेत सहभागी होता येईल. पोलीस भरती प्रक्रियेत परगावचे युवक-युवती मोठय़ा संख्येने सहभागी होतात. त्यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. परगावाहून आलेल्या उमेदवारांना निवास तसेच भोजनाची सुविधा उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांची गैरसोय होते.

भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रथम लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी स्पर्धा घेण्याचे ठरवण्यात आले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेतील गोंधळ आणि दुर्घटना

पोलीस भरती प्रक्रियेसाठी येणारे बहुसंख्य उमेदवार परगावचे असतात. उमेदवारांसाठी निवास तसेच भोजनाची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेतील बहुतांश उमेदवार रस्त्याच्या कडेला झोपतात. दीर्घकाळ शारीरिक चाचणी स्पर्धा सुरू राहते, त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होते. मैदानी चाचणी स्पर्धेत धावताना उमेदवारांना भोवळ येण्याच्या घटना घडतात. भरती प्रक्रियेतील दुर्घटना टाळण्यासाठी शासनाने प्रथम लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉक्टर, द्विपदवीधरसुद्धा भरती प्रक्रियेत

शासकीय नोकरी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक युवक-युवती पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होतात. अगदी वैद्यकीय शिक्षण घेतलेले तसेच पदवीधर, द्विपदवीधर उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.