पुण्यातील भिडे पुलावर काल (दि.8) प्रकाशसिंह श्रीभवान बोहरा(वय-२०) आणि असिभ अशोक उफिल (वय-१८) हे दोघे मित्र पाण्यात पोहोण्यास उतरले होते. पण, त्या दोघांपैकी प्रकाशसिंह श्रीभवान बोहरा हा पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली असून त्याचा अद्यापपर्यंत शोधला लागलेला नाही. या घटनेत बचावलेल्या असिभ अशोक उफिल याच्याशी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने संवाद साधला.

यावेळी बोलताना असिभ अशोक उफिल म्हणाला की, “मी मागील सहा महिन्यापासून पुण्यात कामासाठी आलो असून तेव्हापासून प्रकाशभाई सोबत माझी ओळख होती. आम्ही दोघे सोबत असायचो. हॉटेलवर कामावर जाण्यासाठी निघालो असताना काल दुपारी चार वाजता भिडे पुलावर येऊन थांबलो. आम्ही दोघांनी फोटो काढले. तेव्हा प्रकाश म्हणाला चल आपण पाण्यात उतरू, त्यावर प्रकाश भाई कामाची वेळ झाली आहे. खूप काम बाकी असून लवकर जाऊया असं मी म्हटलो. पण, काही केल्या प्रकाश ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तेवढ्यात प्रकाश म्हणाला तू जर माझा मित्र असशील, तर पाण्यात उतरशील. त्यावर मी लगेच चल आता पाण्यात उतरू असे म्हणालो, यानंतर आम्ही दोघांनी एकत्र पाण्यात उडी मारली. मी पोहत एका काठावर येऊन बाहेर पडलो. पण, प्रकाश भाई काही दिसला नाही. अजून कसा प्रकाश पाण्यातून बाहेर येत नाही याचाच विचार पाण्याकडे पाहत मी करत होतो, त्यावेळी अजून एकजण काठावर असल्याचं पाहिलं. तो माझ्याकडे येऊन म्हणाला अरे प्रकाश भाई तर पाण्यात वाहून गेला. त्यानंतर, या घटनेची माहिती मी हॉटेल मालक आणि पोलिसांना दिली. नंतर काही मिनिटांत मालक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शोध सुरू झाला. पण, अजून काही त्याचा शोध लागलेला नाही”.

तुमच्या दोघांमध्ये पोहण्यावरून पैज लागली होती का, या प्रश्नावर तो म्हणाला की, “आमच्यात कोणतीही पैज लागली नव्हती. मी त्याला पोहोण्यास नकोच म्हणत होतो. जर त्याने माझं ऐकल असतं, तर अशी घटना घडली नसती”. हे सांगताना असिभला अश्रू अनावर झाले. प्रकाशसिंह श्रीभवान बोहरा याच्या शोधासाठी अजून देखील हॉटेलमधील कर्मचारी नदी काठावर बसून आहेत, त्याचा शोध घेण्याचं कार्य अद्यापही सुरू आहे.