पुणे महापालिकेच्यावतीने यंदा गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्यमहोत्सव साजरा करण्यात येतोय. मात्र, पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर आक्षेप घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि पुणे महानगरपालिकेत वाद सुरू आहे. त्यानंतर गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे विशेष बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यात आले. या लोगोवर सुरूवातीला लोकमान्य टिळकांचे चित्र होते. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने टिळकांचे चित्र बोधचिन्हावरून काढून टाकले.

बोधचिन्हावरील लोकमान्य टिळकांचे चित्र काढून टाकल्याच्या वृत्तानंतर पुणे महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांनी यावर स्पष्टीकरण दिले. लोकमान्य टिळकांची प्रतिमा काढून टाकणार आहे, यात काहीच तथ्य नसून पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हात कोणाचीच प्रतिमा वापरण्यात आलेली नाही किंवा वापरणार नाही, असे त्यांनी सांगितले. याशिवाय महिनाभर चालणाऱ्या महोत्सवाच्या अन्य सर्व साहित्यात लोकमान्यांची प्रतिमा दिसेल, असेही मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.

मुक्ता टिळक म्हणाल्या की, महापालिकेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात किंवा महोत्सवाच्या बोधचिन्हामध्ये प्रतिमा नसते. महोत्सवाचा प्रचार व्हावा, यासाठी बोधचिन्ह तयार केले जाते. त्याचा आकार मर्यादित असतो. ते सहजपणे वापरले जाणे अपेक्षित असते. त्यामुळे त्यात प्रतिमा नाही. महोत्सवाच्या अन्य प्रचार साहित्यामध्ये लोकमान्य टिळक यांचे छायाचित्र असणार आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्यावतीने भाऊ रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असल्याने त्यांचा सन्मान ठेवावा, अशी मागणी मागील दोन वर्षांपासून करण्यात येत आहे. लोकमान्यांच्या प्रतिमेबद्धल त्यांचा आक्षेप नाही. मात्र भाऊ रंगारी यांचाही सन्मान ठेवला जावा आणि यंदाचे वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५ वर्षे नसुन ते १२६ वर्ष म्हणून साजरे करावे, अशी मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शतकोत्तर रोप्यमहोत्सावाची सुरुवात केली जाणार आहे.

गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तयार केलेल्या लोगोवरील टिळकांचे छायाचित्र हटवले