तासाभरात २७ मिलिमिटर पावसाची नोंद
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्य़ांतील काही भागांत रविवारी पूर्वमोसमी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. अवघ्या तासाभरातच शिवाजीनगर केंद्रात २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहर आणि परिसरात आणखी चार ते पाच दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे सध्या राज्याच्या विविध भागांत पावसाळी वातावरण आहे. गेल्या आठवडय़ातही पुण्यात पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारी पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्य़ांत पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरात दुपापर्यंत निरभ्र आकाशाची स्थिती होती. मात्र, दुपारी अडीचनंतर आकाश ढगाळ झाले. साडेतीनच्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात होऊन नंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने घराबाहेर आवश्यक कामांसाठी असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे काही वेळांतच रस्त्यांवर पाणी जमा झाले.
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुणे शहर आणि परिसरात सोमवारीही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होणार आहे. त्यानंतर पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहून मेघजर्गना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सहा वर्षांतील उच्चांकी पाऊस
शिवाजीनगर केंद्रावर रविवारी संध्याकाळपर्यंत २७ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. २०१५ नंतर मे महिन्यात शहरात इतक्या मोठय़ा पावसाची नोंद झाली नव्हती. २०१५ मध्ये १४ मे रोजी २४ तासांमध्ये शिवाजीनगर केंद्रावर ४४ मिलिमिटर पावसाची नोंद झाली होती. हे वर्ष वगळता गेल्या दहा वर्षांत मे महिन्यातील एका दिवसात शहरात २३ मिलिमिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली नव्हती.