विदर्भात आज दुपारनंतर पावसाची शक्यता

पुणे शहर आणि परिसरामध्ये सलग चौथ्या दिवशीही कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसच्या वर नोंदविला गेला. त्यामुळे बुधवारीही उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाडा कायम होता. पुढील दोन ते तीन दिवस हा पारा कायम राहणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भामध्ये वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली असल्याने या भागात काही ठिकाणी गुरुवारी दुपारनंतर अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे शहर आणि परिसरामध्ये आठवडय़ापासून उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही तीव्र उकाडा जाणवतो आहे. दुपारी बाहेर निघणे नागरिक टाळत असल्याचे दिसते आहे. त्याचप्रमाणे शहरात शीतपेयांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. मागील चार दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३८ अंशाच्या खाली आला नाही.  शहरात बुधवारी कमाल तापमानाचा पारा ३८.४अंशांवर नोंदविला गेला. १ मार्चला किमान तापमान ३८.१ अंश, ३ मार्चला ३८.२ अंश, तर ३ मार्चला शहरात ३८.,२ अंश तापमान नोंदविले गेले. बुधवारी दुपारी शहरात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडय़ात चांगलीच वाढ झाली होती. पुढील दोन ते तीन दिवस तापमान ३८ अंशांपर्यंत राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातही बुधवारी उन्हाचा तडाखा कायम होता. कोकण, मुंबईत सरासरी ३२ अंश, मध्य महाराष्ट्रात सरासरी ३७ अंश, मराठवाडा, विदर्भात सरासरी ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत बुधवारी किंचित वाढ झाली असून उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

विदर्भात वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने गुरुवारी दुपारनंतर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारनंतर मराठवाडय़ातही मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.