राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद

पृथ्वीला केंद्रिबदू मानून झालेली विश्वाची उत्पत्ती आणि सूर्याला केंद्रबिंदू मानून झालेली विश्वाची उत्पत्ती यामध्ये फरक काय? गुरूत्वाकर्षण कशामुळे होते? ग्रह आणि ताऱ्यांचा व्यक्तीच्या शारीरिक किंवा मानसिक क्षमतांवर परिणाम होतो का? काही दशलक्ष वर्षांनी पृथ्वी आणि बुध यांना सूर्य गिळंकृत करेल का? पृथ्वीचा व्यास कललेला नसता तर काय झाले असते? असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले आणि त्यांना सोप्या शब्दात उत्तरे दिली ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी.

पुणे विद्यापीठातील ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ अर्थात ‘आयुका’ मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. यांपैकी ‘आस्क अ सायंटिस्ट’ कार्यक्रमात डॉ. जयंत नारळीकर आणि आयुकाचे संचालक डॉ. सोमक रायचौधुरी यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मनातील विज्ञान विषयक प्रश्नांना उत्तरे दिली.

डॉ. नारळीकर म्हणाले,की विज्ञानातील अनेक गोष्टींबाबत आजही समाधानकारक उत्तरे नाहीत, त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला माहित नसणे शक्य आहे. मात्र तरी देखील विद्यार्थ्यांनी बेधडक प्रश्न विचारणे आवश्यक आहे. फलज्योतिष, ग्रह, तारे यांचा व्यक्तीच्या क्षमतांवर परिणाम होतो का, या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. नारळीकर म्हणाले,की प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नसलेल्या कोणत्याही गोष्टीला शास्त्र म्हणून संबोधणे योग्य नाही. ज्या गोष्टींना पुराव्याचा आधार आहे त्यांनाच शास्त्र किंवा विज्ञान म्हणतात. ग्रह, तारे यांचा व्यक्तीच्या क्षमतांवर परिणाम होण्याबाबत कोणतेही पुरावे नसल्याने त्यावर विश्वास ठेवणे किंवा शास्त्र म्हणून संबोधणे योग्य नाही.

विज्ञान संशोधनासाठी परदेशी संस्थांना बरोबर घेऊन काम करणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. सोमक रायचौधुरी म्हणाले,की विज्ञान संशोधन ही एका व्यक्तीने करण्याची गोष्ट नाही. त्यासाठी लागणारी साधन सामग्री, उपकरणे आणि पायाभूत सुविधा हे सगळेच अत्यंत खर्चिक असल्याने त्यात अनेक देश, संस्था एकत्र येऊनच काम करतात. मात्र संशोधनासाठी पूरक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता भारत जागतिक स्तरावर पुढाकार घेत आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘आयुका’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आस्क अ सायंटिस्ट’ कार्यक्रमात डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. सोमक रायचौधुरी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.