शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा शाळास्तरावरच राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी शाळास्तरावरच केली जाणार असून, यंदा २४ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची सुरुवात १५ जूनपासून करण्यात आली आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कागदपत्र पडताळणी केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्यात अडचणी येणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी अपवाद म्हणून शाळास्तरावर कागदपत्र पडताळणी आणि संकलन करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यंदा प्रवेशासाठी १ लाख १५ हजार ४४६ रिक्त जागा आहेत. तर २ लाख ९१ हजार ३७० अर्ज आले आहेत. प्रवेशासाठी १ लाख ९२७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या पाश्र्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळा, पालक आणि पडताळणी समिती यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेचे नियंत्रण शिक्षणाधिकाऱ्यांकडे राहणार आहे.

प्रवेशाबाबत शाळांची जबाबदारी

*  आरटीई संकेतस्थळावर शाळेच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांची नावे, मोबाइल क्रमांक उपलब्ध

* विद्यार्थ्यांच्या नावापुढे दिनांक टाकून संबंधित पालकांना प्रवेशासाठी लघुंसदेश पाठवणे

* पालकांकडून मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रत घेऊन प्राथमिक तपासणी करणे

* कागदपत्रे योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाइन नोंद करून तात्पुरता प्रवेश देऊन पालकांकडून हमीपत्र घेणे

* आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रमांचा लाभ देणे

*  पडताळणी समितीकडून प्रवेश निश्चित करणे