उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय; मोशीतील गायरान जागेत उभारणी

पिंपरी : पिंपरी पालिकेच्या वतीने मोशीतील गायरानाच्या जागेत राबवण्यात येणारा, मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रखडलेला ‘सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र’ हा प्रकल्प आता राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि महापालिका संयुक्तपणे राबवणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सिंगापूरच्या सेन्टॉसा पार्कच्या धर्तीवर मोशीत सुमारे दीड हजार कोटी खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा सफारी पार्क प्रकल्प राबवण्याचे नियोजन महापालिकेने यापूर्वीच केले होते. त्यासाठी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी बराच पाठपुरावा केला होता.  राज्यात खांदेपालट झाल्यानंतर शहराच्या वैभवात भर घालणारा हा प्रकल्प रखडण्याची चिन्हे दिसू लागली होती. सुरुवातीला अपेक्षित कार्यवाही झाली नाही. नंतर, निवडणूक आचारसंहिता, करोनाचे संकट आदी कारणांमुळे प्रकल्पाचे भवितव्य अंधकारमय झाले होते.

या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात यासंदर्भात बैठक घेतली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासह वरिष्ठ सनदी तसेच िपपरी पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्यातील त्रुटी दूर करून पर्यटन विभाग आणि महापालिका संयुक्तपणे

हा प्रकल्प राबवण्यास हिरवा

कंदील दाखवण्यात आला. प्रकल्पासाठी निश्चित केलेली जागा पर्यटन विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून महापालिका व राज्य शासन प्रकल्पाच्या खर्चाचा वाटा उचलणार असल्याचे सांगण्यात आले.

 

‘समाविष्ट विकासाच्या विकासाला चालना’

सफारी पार्क प्रकल्पासाठी आरक्षित असणारी जागा पुणे महापालिकेचा कचरा टाकण्याच्या कामासाठी उपयोगात आणली जाणार, अशी आवई गेल्या वर्षी उठली होती, तेव्हा विरोधासाठी सर्वपक्षीयांनी ‘मोशी बंद’ आंदोलन केले होते. समाविष्ट गावांच्या विकासासाठी या प्रकल्पामुळे चालना मिळेल, असे सांगत हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी जाहीर केले होते. सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केल्यास तत्काळ मान्यता देऊ, अशी ग्वाही यापूर्वीच्या पर्यटनमंत्र्यांनी दिली होती. मात्र, नंतरच्या काळात प्रकल्पाचे काम ठप्प झाले होते.