सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट यंत्रणा वादात; यंत्रणा उभारण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकातून पाच कोटी रुपयांचे वर्गीकरण

सॅनिटरी नॅपकिनच्या माध्यमातून होणारा कचरा आणि प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक प्रभागात सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट (डिस्पोजल) यंत्रणा उभारण्याच्या नावाखाली महापालिकेने कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी सुरू केली आहे. अवघ्या साडेचार कोटी रुपयांमध्ये शहरातील प्रत्येक प्रभागात ही यंत्रणा उभारणे शक्य असतानाही या कामांसाठी प्रशासनाने तब्बल चौदा कोटींची निविदा तयार केली आहे. विशेष म्हणजे जनजागृती, प्रचार, जाहिराती आणि देखभाल दुरुस्ती आदी बाबींवर प्रत्येक यंत्रामागे सव्वाचार लाख रुपयांची उधळपट्टी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सॅनेटरी नॅपकिन डिस्पोजल यंत्रणा वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सॅनिटरी नॅपकीन आणि डायपरसारख्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल युनिट्स उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीने सादर केलेल्या या प्रस्तावाला स्थायी समितीने आणि त्यानंतर मुख्य सभेनेही मान्यता दिली आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकातून पाच कोटी रुपयांचे वर्गीकरणही करण्यात आले आहे. या प्रस्तावाला तांत्रिक समितीने मान्यता दिल्यामुळे त्याची निविदा प्रक्रिया महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. पुढील वर्षी मार्च अखेपर्यंत शहरातील प्रत्येक प्रभागात ही यंत्रणा बसविण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. पण ही यंत्रणा उभारताना उधळपट्टी करण्याची परंपरा महापालिका प्रशासनाने कायम ठेवली आहे.

शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३५ ठिकाणी ही यंत्रणा उभारणे, शहरातील जागांचे सर्वेक्षण करणे, जनजागृती करणे, सॅनिटरी नॅपकिनचे संकलन करणे, त्याची वाहतूक करून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणे अशा कामांसाठी ही निविदा तयार करून त्याची जाहिरात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यंत्रणेची माहिती देणारी प्रसिद्धिपत्रके तयार करणे, अहवाल लेखन, जनजागृती, शेडची उभारणी, वाहतूक खर्च, कर्मचाऱ्यांचे आरोग्य अशा बाबींचा विचार केला, तर या सर्व बाबींसाठी वार्षिक जास्तीत जास्त पाच लाख रुपये खर्च होतो, अशी माहिती काही उत्पादक आणि हे काम करत असलेल्या कंपन्यांकडून देण्यात आली. मात्र पाच वर्षांसाठी तीन कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. १५ प्रभागांतील ३५ ठिकाणी ही यंत्रणा उभारण्याचा खर्च १४ कोटींच्या घरात जात आहे. सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल यंत्राची अधिकतम रक्कम दोन लाखांपर्यंत असते, अशी माहिती काही पुरवठादार कंपन्यांकडून देण्यात आली. त्यामुळे यंत्रणा उभारण्याच्या नावाखाली महापालिकेने उधळपट्टी सुरू केल्याचेही स्पष्ट होत आहे.

३५ प्रभागांसाठी प्रस्ताव तयार

शहरातील १२ प्रभागांमध्ये सध्या ही यंत्रणा कार्यान्वित आहे. वर्तक उद्यान, आंबील ओढा, पेशवे उद्यान, डेक्कन, कोरेगाव पार्क, हडपसर, घोले रस्ता, पोलीस लाइन, नगर रस्ता आणि १५ शाळांमध्ये ही यंत्रणा सध्या अस्तित्वात आहे. या यंत्रणेमध्ये जमा होणारा सॅनिटरी कचरा इन्सिनरेटमध्ये विशिष्ट तापमानात जाळला जातो. शहरात प्रतिदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये तब्बल दोन टन एवढे सॅनिटरी नॅपकिन असतात. सध्या सहा प्रभागात त्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. उर्वरित ३५ प्रभागांत तशी यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.