गेल्या वर्षी विद्यापीठ १८८व्या स्थानावर; ‘द टाइम्स हायर एज्युकेशन’चा आशियाई शिक्षण संस्थांचा अहवाल जाहीर

आशियाई विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठी झेप घेत १०९वे स्थान प्राप्त केले आहे. आशियातील एकूण ४०० विद्यापीठांच्या या यादीत महाराष्ट्रातून पारंपरिक विद्यापीठांमध्ये केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळवले. तर राज्यातील केंद्रीय संस्थांमध्ये आयआयटी मुंबई आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च (आयसर, पुणे) या दोनच संस्थांना स्थान मिळाले आहे.

‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ने बुधवारी रात्री उशिरा हा अहवाल जाहीर केला. या यादीत पहिल्या शंभर शिक्षण संस्थांमध्ये चीन, जपान, हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया, टर्की, तैवान आदी देशांतील शिक्षण संस्थांचा समावेश आहे. तर भारतातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (२९), आयआयटी इंदूर (५०) आयआयटी मुंबई (५४), आयआयटी रूरकी (५४) जेएसएस अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च (६२) आयआयटी खरगपूर (७६), आयआयटी दिल्ली (९१) या संस्थांनी स्थान प्राप्त केले. देशातील एकाही पारंपरिक विद्यापीठाला पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळवता आले नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेल्या वर्षी या यादीत १८८ व्या स्थानी होते. मात्र, यंदा विद्यापीठाने कामगिरीत सुधारणा करत १०९ व्या स्थानी झेप घेतली. पुणे विद्यापीठानंतर पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये तेजपूर विद्यापीठ (१३०), आयआयटी भुवनेश्वर (१३१), आयआयटी हैदराबाद (१३५), पंजाब विद्यापीठ (१३६), बनारस हिंदू विद्यापीठ (१५०), आयआयटी गुवाहाटी (१४३), जादवपूर विद्यापीठ (१४४), दिल्ली विद्यापीठ (१५६), एनआयटी रूरकेला (१६०), अम्रिता विश्व विद्यापीठम (१६४), आयआयटी धनबाद (१७०) अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी (१८२), जमिला मिलिया इस्लामिया (१८८) या विद्यापीठांना स्थान मिळाले. तर पहिल्या १५० शिक्षण संस्थांमध्ये भारतातील केवळ तीन पारंपरिक विद्यापीठांना स्थान मिळाले. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे.

या पूर्वी जानेवारीत जाहीर झालेल्या टाइम्स हायर एज्युकेशनच्याच इमर्जिग युर्निव्हर्सिटीजच्या यादीत विद्यापीठाने जगात ९३ वा क्रमांक मिळवण्याची कामगिरी केली होती.

आशिया खंडातील शिक्षण संस्थांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १०९ वे स्थान मिळवले आहे. विद्यापीठाच्या क्रमवारीत झालेली सुधारणा अत्यंत आनंददायी आहे. विद्यापीठाने १०९ वे स्थान पटकावताना देशातील महत्त्वाच्या विद्यापीठांना, राष्ट्रीय शिक्षण संस्थांना मागे टाकले आहे. या कामगिरीमुळे विद्यापीठाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याची खात्री वाटते. या सुधारित मानांकनाचा विद्यापीठाला येत्या काळात नक्कीच फायदा होईल.   – डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ