मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सहापैकी पाच विधानसभा मतदार संघातून मताधिक्य मिळाले असून पार्थ पवार यांनी फक्त एकाच मतदार संघात बारणे यांना लढत देत जेमतेम १८०० मतांची आघाडी घेतली.

मावळ लोकसभेत पुणे जिल्ह्य़ातील तीन आणि रायगड जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. मावळात भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. शेकाप, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा पक्षांची वेगवेगळी प्रभावक्षेत्रे मतदार संघात दिसून येतात. गेल्या वेळी बारणे यांच्याविरोधात आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा देणाऱ्या शेकापने यंदा आपली ताकद राष्ट्रवादीच्या पाठीशी उभी केली होती. सहापैकी केवळ कर्जत मतदार संघात राष्ट्रवादी-शेकापने बारणे यांच्यावर आघाडी घेतली असून उर्वरित पाचही विधानसभा क्षेत्रात महायुतीने मोठे मताधिक्य घेतले आहे.

पिंपरी

विद्यमान आमदार-

गौतम चाबुकस्वार, शिवसेना

बारणे यांना ४१,२९४ मतांची आघाडी

पिंपरीत गौतम चाबुकस्वार हे शिवसेनेचे आमदार आहेत. भाजपचे खासदार अमर साबळे यांचे वास्तव्य याच भागात आहे. भाजप आणि रिपाइंची मोठी ताकद पिंपरी मतदार संघात आहे. त्यामुळे पिंपरीतून बारणे यांना चांगले मतदान होईल, असे शिवसेनेचे गणित होते. त्यानुसार झालेही. एक लाख तीन हजार २३५ मते मिळवत बारणे यांनी ४१ हजाराचे मताधिक्य घेतले. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते याच मतदार संघात आहेत. या पट्टय़ात मोठय़ा संख्येने असलेल्या झोपडपट्टय़ांकडे राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले होते. प्रत्यक्षात, राष्ट्रवादीला पिंपरीत ६१ हजार मतांवरच समाधान मानावे लागले. वंचित आघाडीच्या कपबशीला पिंपरीत १८ हजार मते मिळाल्याने चांगला प्रतिसाद दिसून आला.

चिंचवड

विद्यमान आमदार-

लक्ष्मण जगताप, भाजप

बारणे यांना ९६ हजार ७५८ मतांची आघाडी

भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे चिंचवड विधानसभेचे आमदार आहेत.

त्यांची मोठी ताकद या भागात आहे. श्रीरंग बारणे यांचे कार्यक्षेत्रही याच भागात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारणे आणि जगताप यांचे मनोमिलन झाले. याशिवाय, भाजप-शिवसेनेची एकत्रितपणे मोठी ताकद या मतदार संघात आहे. त्यामुळे बारणे यांना चिंचवडमधून मोठे मताधिक्य मिळण्याची खात्री सर्वानाच होती. त्यानुसार, बारणे यांना एक लाख ७६ हजार मते मिळाली. पार्थ पवार यांना ७९ हजार मतांवर समाधान मानावे लागले. याही मतदार संघात वंचित आघाडीला १७ हजार मते मिळाली.

मावळ

विद्यमान आमदार-

बाळा भेगडे, भाजप

बारणे यांना २१ हजार ८२७ मतांची आघाडी

भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय ऊर्फ बाळा भेगडे हे मावळ विधानसभेचे भाजपचे आमदार आहेत. मावळ विधानसभा सुरुवातीपासून भाजपचा गड मानला जातो. राष्ट्रवादीची मोठी ताकद या भागात असली तरी नेत्यांच्या गटबाजीचा फायदा प्रत्येक वेळी भाजपला होत होता. यंदा अजित पवार यांचा मुलगाच िरगणात असल्याने नेत्यांच्या गटबाजीचे राजकारण झाले नाही. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुरूवातीपासून मावळात लक्ष केंद्रित केले होते. राष्ट्रवादीने एकसंधपणे काम करून भेगडे तसेच बारणे यांच्यापुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तथापि, बारणे यांनी एक लाख मतांचा टप्पा ओलांडत मावळमधून २१ हजार मतांची आघाडी घेतली.

पनवेल

विद्यमान आमदार

प्रशांत ठाकूर, भाजप

बारणे यांना ५४ हजार ६५८ मतांची आघाडी

पनवेल विधानसभा क्षेत्रात पाच लाखाहून अधिक मतदारसंख्या होती. त्यामुळे सर्वानीच या भागावर अधिक लक्ष दिले. माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या या भागात महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पट्टय़ात शेकापची ताकदही आहे. मात्र, त्यांचा प्रभाव कमी होत चालला आहे. बारणे यांनी पनवेलमधून एक लाख ६० हजार मते घेत ५४ हजाराचे मताधिक्य मिळवले. पार्थ यांना एक लाख पाच हजार मतांवरच समाधान मानावे लागले.

उरण

विद्यमान आमदार

मनोहर भोईर, शिवसेना

बारणे यांना दोन हजार ८८८ मतांची आघाडी

उरण मतदार संघात शिवसेनेचे मनोहर भोईर आमदार आहेत. शिवसेना तसेच शेकापची चांगली ताकद असलेला हा भाग आहे. शेकापच्या सहकार्याने राष्ट्रवादीने चांगली लढत दिल्याचे दिसून आले. श्रीरंग बारणे यांना ८९ हजार ५८७ आणि पार्थ पवार यांना ८६ हजार ९९९ मते मिळाली. इतर विधानसभांच्या तुलनेत राष्ट्रवादीने शिवसेनेला रोखण्याचे काम उरण मतदार संघात केल्याचे दिसून आले.

कर्जत

विद्यमान आमदार

सुरेश लाड, राष्ट्रवादी

पार्थ पवार यांना १८५० मतांची आघाडी

कर्जत विधानसभेत राष्ट्रवादीचे सुरेश लाड हे आमदार आहेत. मावळ लोकसभेच्या सहापैकी केवळ या विधानसभेत पार्थ पवार यांना श्रीरंग बारणे यांच्यावर मताधिक्य घेता आले. बारणे यांना ८३ हजार ९९६ मते मिळाली. तर, पवार यांना ८५ हजार ८४६ मते मिळाली. हे मताधिक्य जेमतेम १८५० इतकेच होते.