शहरातील उपनिबंधक कार्यालये सुरूच

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहरे, हवेली तालुका आणि ग्रामीण भागातील काही भागात २३ जुलैपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, दस्त नोंदणीची कार्यालये टाळेबंदी काळातही सुरूच राहणार असून अत्यावश्यक बाब म्हणून नागरिकांना दस्त नोंदवता येणार आहेत. त्याकरिता पोलीस यंत्रणेकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड, हवेली तालुका आणि जिल्ह्य़ातील २३ ग्रामपंचायतींच्या परिसरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. हा भाग वगळता जिल्ह्य़ाच्या उर्वरित भागात शिथिलता कायम आहे. मात्र, राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीची कार्यालये सुरू ठेवली आहेत. २३ जुलैपर्यंत या कार्यालयांमध्ये अंतर्गत कामे सुरू राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक बाब म्हणून काही नागरिकांना दस्त नोंदणी करायची असल्यास पोलिसांकडून परवाना घेऊन दस्त नोंदणीचे काम करता येणार आहे.

‘टाळेबंदी काळात दस्त नोंदणीची कार्यालये सुरू ठेवण्यात आली असली, तरी नागरिक दस्त नोंदणीसाठी येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, अत्यावश्यक असल्यास परवाना घेऊन नागरिकांना दस्त नोंदवता येणार आहेत. नोंदणी कार्यालये सुरू ठेवून कार्यालयीन अंतर्गत कामे करण्यात येत आहेत. त्यामध्ये कागदपत्रांचे स्कॅ निंग करण्यासह अन्य कामे सुरु आहेत’, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी दिली.

शहरातील तीन कार्यालये बंदच

राज्यातील ५१७ कार्यालयांपैकी प्रतिबंधित क्षेत्रात असलेली पाच दुय्यम निबंधक कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये शहरातील तीन कार्यालयांचा समावेश आहे. पुणे शहर सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक १२, सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक १७ आणि सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक २५ ही कार्यालये बंद आहेत. शहरात २८ दुय्यम निबंधक कार्यालये असून त्यापैकी २५ कार्यालये यापूर्वीच सुरू झाली आहेत.